सिडनीमध्येही मंगलमूर्ती मोरयाचा नामघोष
तळेगाव स्टेशन, ता.१० : लाडक्या गणरायाप्रती भक्तीचा प्रत्यय सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतही दिसून आला. तेथील मराठीजनांनी मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. मराठी संस्कृतीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून ठेवण्याच्या हेतूने सिडनीकर मराठीजनांनी हा गणेशोत्सव आयोजित केला.
सिडनी परिसरात जवळपास पाचशे ते सहाशे मराठी भाषक कुटुंबाकडून घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. सिडनी शहरालगतच्या जॉर्जेस नदीच्या पात्रात गणेशमूर्ती विसर्जन केले जात असे. मात्र, त्यामुळे वाढत असलेले जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सह्याद्री सिडनी संस्थेने गतवर्षीपासून ‘आदरयुक्त भक्ती, जबाबदारीपूर्वक विसर्जन’ हा उपक्रम हाती घेतला. त्याअनुषंगाने गतवर्षी मराठी गणेशभक्तांना नदी ऐवजी कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जनाबाबत केलेल्या आवाहनानंतर त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. त्याची दखल घेत सिडनीमधील स्थानिक लिव्हरपूल शहर परिषदेने ऑस्ट्रेलिया दिनी सह्याद्री सिडनी संस्थेचा ‘फ्रेजर एन्व्हायरमेंट ॲवॉर्ड’ देऊन खास सन्मान केला आणि विशेष म्हणजे यंदाच्या गणेश विसर्जनवेळी सदर उपक्रमासाठी स्थानिक प्रशासनाने संस्थेला स्वतंत्र जागा, मदतनीस आणि साधनसामग्री उपलब्ध करुन दिली. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात १० दिवसांत मिळून पाचशेहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडामध्ये करण्यात आले. पारंपरिक ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात लाडक्या गणरायाला सामुदायिक आणि पर्यावरणपूरक निरोप देण्यात आला. स्थानिक लिव्हरपूल शहर परिषदेचे अधिकारी देखील गणेशविसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते. विसर्जनानंतर खास मोदक, लाडू, बर्फीसह मसाले भाताच्या महाप्रसादाचा सर्वानी आनंद घेतला.
TLS25B06197