तळेगाव शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत
गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. ५ : तळेगाव दाभाडे शहराच्या सार्वजनिक सुरक्षेच्या बळकटीकरणासाठी नगर परिषद प्रशासनाने ८६ सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा, हा या मागचा प्रमुख हेतू आहे. शहराची प्रवेशद्वारे, प्रमुख रस्ते, मुख्य चौकांसह कानाकोपऱ्यावर या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.
तळेगाव दाभाडे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये चोरी, घरफोडी आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जुलै २०२५ मध्ये या सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला सुरवात झाली होती. यासाठी मोक्याच्या २९ ठिकाणांची निवड करण्यात आली. तेथे ८६ सीसीटीव्ही बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पैकी ५५ कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एक कोटी ६३ लाख ८३ हजार ८५३ रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
‘‘या कॅमेऱ्यांद्वारे देखरेखीसाठी दोन स्वतंत्र नियंत्रण कक्ष (सर्व्हर रुम) नियोजित आहेत. यात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यातील मुख्य सर्व्हर रूम आणि नियंत्रण कक्ष उभारणी पूर्ण होत आली आहे. सुभाष चौकातील जुन्या पोलिस ठाण्याच्या इमारतीमध्ये दुसरे नियंत्रण केंद्र उभारले जाणार आहे,’’ अशी माहिती नगर परिषदेच्या विद्युत विभागाच्या अभियंता स्मिता म्हस्के यांनी दिली.
सीसीटीव्ही बसविण्याचे फायदे
- शहरातील हालचालींवर २४ तास लक्ष ठेवणे पोलिसांना सोपे होणार
- परिसरातील गुन्हेगारी,अपघात आणि इतर बारीक सारीक घटनांची उकल करण्यासाठी फायदा
- गुन्हेगारांवर वचक बसण्यासह नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढीस लागेल
- वाहतूक कोंडी सोडवणे आणि अपघातांच्या चौकशीसाठी या यंत्रणेद्वारे मदत होणार
नगरप रिषदेने या प्रकल्पाच्या दीर्घकालीन देखभालीसाठी विशेष तरतूद केली आहे. संबंधित कंत्राटदाराला पहिल्या दोन वर्षांसाठी मोफत देखभाल करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यानंतरच्या पुढील तीन वर्षांसाठी वार्षिक देखभालीचे कंत्राट ७३ लाख ७२ हजार ७३३ रुपये इतके असून, ही रक्कम टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार आहे.
शहरात सीसीटीव्ही बसविण्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यानंतर तळेगाव दाभाडे शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत येईल. शहर अधिक सुरक्षित होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
- गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, तळेगाव दाभाडे
सीसीटीव्ही कार्यन्वित झालेली ठिकाणे
घोरावडी स्टेशन, खळवाडी, गणपती चौक, डोळसनाथ मंदिर, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक, लिंब फाटा, पाताळेश्वर मंदिर, मावलाई मंदिर, बेटी बचाव शिल्प- कडोलकर कॉलनी, खांडगे पंप, मामासाहेब खांडगे चौक, तत्व हॉटेल, स्टेशन चौक, सेवाधाम हॉस्पिटल, नूतन कॉलेज गेट, स्वराज नगरी गेट, एसटी बस स्थानक, रेल्वे स्टेशन गेट, मराठा क्रांती चौक, इंद्रायणी कॉलेज गेट, माळवाडी हद्द, जोशीवाडी डीपी रस्ता आदी.
सीसीटीव्हीची प्रस्तावित ठिकाणे
म्हस्करनेस कॉलनी, भेगडे तालीम, खडकेश्वर मंदिर, नॅशनल हेवी-एनएच-४८ सेवा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे गेट-वीरचक्र चौक, इंद्रायणी स्कूल-कातवी रस्ता, डॉ. आंबेडकर स्मारक कमान, वतननगर-भाटिया कॉलनी, मनोहरनगर आदी.
दृष्टीक्षेपात प्रकल्प
एकूण नियंत्रण कक्ष : २
एकूण सीसीटीव्ही : ८६ (बुलेट कॅमेरा : ६७, पीटीझेड कॅमेरा : ८)
एकूण खांब : ४८
PNE26V82765
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

