हरिनामातील दंग वारकरीही हळहळले...

हरिनामातील दंग वारकरीही हळहळले...

Published on

तळेगाव स्टेशन, ता.२८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच दशमीनिमित्त भंडारा डोंगर पायथ्याशी सुरू असलेल्या सप्ताहात हरिनामात दंग असलेले वारकरी देखील हळहळले. वारकऱ्यांच्या सोयीसाठी कॉरिडॉर उभारण्याचा त्यांचा संकल्प सर्वांच्या सहकार्याने सिद्धीस नेण्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना व्यक्त करत श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट आणि वारकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपमुख्यमंत्री पवार हे परखड पुरोगामी विचारांचे होते. मात्र त्यांची जगद्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि वारकऱ्यांप्रती अपार श्रद्धा होती. श्री क्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढपूरकडे प्रस्थान होण्याच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी १८ जूनला पवार यांनी खास दोन तास वेळ काढून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सदिच्छा भेट दिली होती.
भंडारा डोंगर पायथ्याशी असलेली सव्वाशे एकर गायरान जमीन ताब्यात घेऊन वारकऱ्यांच्या सोयीसाठी शासनातर्फे येथे भव्य कॉरिडॉर विकसित करुन सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार डोंगरावरील नियोजित मंदिराच्या कामाची अगदी बारकाईने पाहणी करुन त्याचे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना पवार यांनी संबंधितांना दिल्या होत्या. मंदिराचे नियोजन, रचना, श्रद्धास्थळ म्हणून वारकरी, भाविकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा आणि भावी पिढ्यांसाठी संत साहित्य व आध्यात्मिक वारसा जपण्याच्या दृष्टीने सुरू असलेले हे कार्य फारच स्तुत्य असल्याचे नमूद करत पवार यांनी मंदिर बांधकामाचे तोंडभरुन कौतुकही केले.
संत तुकाराम महाराजांचे कार्य, विचार आणि वारसा अखंडपणे टिकवणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सर्वांना ठामपणे सांगितले. मंदिर बांधकामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचा शब्दही त्यांनी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांना दिला होता. मात्र, अचानक त्यांच्या अपघाती निधनाने सर्वांना धक्का बसला. श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील त्यांच्या भेटीच्या वेळीची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
बाळासाहेब काशीद आणि वारकरी रत्न छोटे माऊली महाराज कदम म्हणाले,‘‘दादांमध्ये स्पष्टवक्तेपणा होता. घड्याळाच्या काट्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेळेवर जाणारा माणूस होते. अगदी कागदाच्या साध्या चिट्ठीवर लिहून दिले तरी तत्परतेने काम करणारे दादा म्हणजे लोभस आणि सर्वसामान्यांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व होते. वक्तशीरपणे अहोरात्र मायबाप जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणारे उमदे नेतृत्व आकस्मिकपणे वेळ चुकवून आज आपल्यातून हरपले. त्यामुळे अखिल वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्राचेच अतोनात हानी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज नि:शब्द झाला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com