मुंबई-पुणे महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

Published on

तळेगाव स्टेशन, ता. ५ : रस्त्यात बंद पडलेला अवजड ट्रेलर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अचानक मागे सरकून महामार्गावर आडवा झाला. यामुळे मुंबईकडून देहूरोड, निगडी, पुण्याकडे जाणारी वाहतूक तब्बल तीन तास विस्कळित झाली. हा प्रकार घोरावडेश्वर पायथ्यालगत गुरुवारी (ता.५) दुपारी दोनच्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रेलर गुरुवारी पहाटे बंद पडला. त्यामुळे अर्धा रस्ता आधीच व्यापला गेला होता. दरम्यान, चालकाने ट्रेलरच्या चाकांखाली दगड अथवा काही अडथळा ठेवला नाही. त्यामुळे ट्रेलर अचानक मागे सरकला आणि त्याने पूर्ण रस्ता व्यापला. येथील दुभाजकातील चिंचोळ्या जागेतून एकच वाहन जाऊ शकल्याने वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या. त्यातच एका चालकाने कंटेनर तिरपा आणला. तो ट्रेलरच्या कोपऱ्याला अडकून जवळपास पंधरा मिनिटे रहदारी ठप्प झाली. मुंबईकडून येणाऱ्या एका ई-शिवनेरी बसचालकासह इतर काही बेशिस्त चालकांनी उलट्या दिशेने वाहने आणली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूकही काही काळ ठप्प झाली आणि सोमाटणे फाटा चौकापर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. सायंकाळी चारच्या सुमारास आयआरबी कंपनीची यंत्रणा आणि क्रेन तेथे पोहोचली. अपघातग्रस्त ट्रेलर हटवण्यासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली. कमी क्षमतेच्या क्रेनने अवजड ट्रेलर उचलता न आल्याने तो बाजूला सरकवून महामार्ग मोकळा केल्यानंतर साडेचारनंतर वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आणि सुमारे तीन तासांनंतर या कोंडीतून वाहन चालकांसह प्रवाशांची सुटका झाली. तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश लोंढे आणि सहकाऱ्यांनी वाहतूक नियमन करत रहदारी सुरळीत केली. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि लष्कराचे जलद प्रतिसाद पथक देखील मदतीला आले.

प्रवाशांचा संताप
या ट्रेलरच्या प्रकारानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि टोल कंत्राटदार ‘आयआरबी’च्या ढिम्मपणावर प्रवाशांनी बोट ठेवले आहे. हा ट्रेलर महामार्गावर पहाटेपासून बंद अवस्थेत होता. तो वेळीच बाजूला करणे अपेक्षित होते. तो अचानक मागे गेला. यात कोणाला इजा झाली नसली, तरी सर्वांनाच कोंडीचा त्रास सहन करावा लागला. वाहतूक पोलिसांनी दोन-तीन वेळा फोन करुनही तब्बल दोन तासांनी ‘आयआरबी’चे कर्मचारी आले. अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला काढण्यास तासभर गेला. त्यामुळे कोंडीत अडकलेल्या प्रवासी आणि वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com