
वडगाव-तळेगाव दरम्यान चार तास वाहतूक कोंडी
वडगाव मावळ ता. १३ : पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव-तळेगाव फाट्यावर शुक्रवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास लोखंडी कॉईल घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने पुणे-मुंबई व तळेगाव-चाकण महामार्गावरील वाहतूक सुमारे चार तास ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
शुक्रवारी सकाळी उर्से येथून लोखंडी कॉईल घेऊन आलेला ट्रक (एम.एच ४६ बी.बी ७९१६) हा वडगाव फाट्याजवळील वळणावर पलटी झाला. चालक ममीदुल शेख (वय ३५) हा ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. पोलिसांनी तत्परता दाखवत ट्रकचा पत्रा कापून अर्ध्या तासाने त्याला बाहेर काढले. त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला वडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अतिशय वर्दळीच्या चौकात ट्रक पलटी झाल्याने चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली. पुणे-मुंबई महामार्ग, तळेगाव - चाकण महामार्ग तसेच द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या वडगाव-उर्से कनेक्टरवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. महामार्गावर सुमारे चार ते पाच किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. सकाळची वेळ असल्याने कामगार, विद्यार्थी तसेच प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले व मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सुमारे चार तास वाहतूक कोंडी झाली होती. क्रेनच्या साह्याने अपघात ग्रस्त ट्रक बाजूला घेतल्यानंतर धिम्या गतीने वाहतूक सुरू झाली. फाट्यावरील वाहतूक पोलिस कर्मचारी कैलास कदम, अनिकेत बोऱ्हाडे, कुंडलिक सुतार, सागर पोखरकर, सुनील नागरगोजे यांनी वाहतुकीचे नियमन केल्याने चार तासानंतर वाहतूक पूर्व पदावर आली.
तळेगाव फाट्यावर कोंडी नित्याची
तळेगाव दाभाडे (स्टेशन) ः वडगाव-तळेगाव फाट्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. पुणे-मुंबई महामार्ग तसेच तळेगाव-चाकण महामार्गावरून येणारी वाहने द्रुतगती मार्गाकडे जाताना फाट्यावर वाहनांची मोठी वर्दळ होते. त्यातच उर्से व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांची माल व कामगार वाहतूक करणारी वाहने, खाण-क्रशर उद्योगाची अवजड वाहने यांचीही संख्या मोठी असल्याने फाट्यावर वाहतुकीचा मोठा ताण असतो. त्यातच बेजबाबदार व बेशिस्त वाहन चालकांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथे कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.