
तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ वडगावमधील गॅस गळती ः वीस दिवसांमध्ये गॅस एजन्सीचा पोलिसांना शोध लागेना
वडगाव मावळ, ता. १८ ः वीस दिवसांपूर्वी येथे गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत जखमी झालेल्या चारपैकी तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हे चौघे जण कोणत्या गॅस एजन्सीमध्ये काम करत होते तसेच त्यांनी बेकायदा साठवून ठेवलेले ४४ गॅस सिलिंडर कोणाकडून आणले होते, याचा अद्याप शोध न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या संदीप अशोक राऊत (वय ३३, रा. वडगाव मावळ ), बबन रमेश बिरादार ( वय २६, मूळ रा. हचनाळ ता. देवणी, जि. लातूर ), भरत रावसाहेब फावडे (वय ३४, मूळ रा. लासोना, ता. देवणी, जि. लातूर ) या तिघांचा मृत्यू झाला असून, मनोज देविदास पाटील (वय ३०, रा. पिसर्डे, ता. भडगाव, जि. जळगाव ) याच्यावर बेंबडे हॉस्पिटल
(जालना रोड, औरंगाबाद ) येथे उपचार चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या २७ फेब्रुवारीला ढोरे चाळीतील एका खोलीत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून गॅस गळती होऊन, गॅसने पेट घेऊन उडालेल्या भडक्यात हे चौघे जण जखमी झाले होते. उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना या खोलीमध्ये ४४ गॅस सिलिंडर आढळून आले होते. त्यापैकी भारत गॅस कंपनीचे कमर्शियल दोन सिलिंडर, एचपी कंपनीचे घरगुती वापराचे ४० सिलिंडर, इंडियन कंपनीचा एक कमर्शिअल सिलिंडर व हिंद गॅस कंपनीच्या एका सिलेंडरचा समावेश आहे. हे चारही जण सिलिंडर वितरित करण्याचे काम करीत होते. बबन बिरादार हा पूर्वी येथील अनुराग गॅस एजन्सीमध्ये काम करत होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. बेकायदा व विना परवाना काळ्या बाजाराने बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने ज्वालाग्राही सिलेंडरचा साठा खोलीत ठेवून दुर्घटनेस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलिसांनी या चौघांसह त्यांना बेकायदेशीररित्या गॅस सिलिंडर पुरविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेला वीस दिवस उलटूनही अद्याप हे चौघे जण कोणत्या गॅस एजन्सीमध्ये काम करत होते व घटनास्थळी मिळून आलेले गॅस सिलिंडर हे कोणत्या एजन्सीचे आहेत, याचा शोध न लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून वडगाव शहरातील घरपोच गॅस पुरवठा विस्कळित झाला आहे. त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, हे सिलिंडर कोठून आणले होते, हे निष्पन्न करण्यासाठी गॅस कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.