मावळच्या विकासासाठी ४० कोटींचा निधी आमदार सुनील शेळके ः तालुक्यातील ६५ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठली

मावळच्या विकासासाठी ४० कोटींचा निधी
आमदार सुनील शेळके ः तालुक्यातील ६५ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठली
Published on

वडगाव मावळ, ता. १७ : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मावळ तालुक्यासाठी ३९ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली. याशिवाय सत्तेत सहभागी झाल्यामुळे तालुक्यातील ६५ कोटी ५९ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांवरील स्थगितीही उठल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशनात मावळ तालुक्यासाठी मंजूर झालेल्या विकास कामांची माहिती आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. तालुक्यासाठी ३९ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यात कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी ९ कोटी १२ लाख रुपये, पौड - लोणावळा रस्त्यावरील पवना नदीवर मोठा पूल बांधण्यासाठी जोडरस्त्याच्या भू संपादनासाठी २ कोटी २० लाख रुपये, सांगवडे - आढले - येळसे रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ६ कोटी ५० हजार रुपये, कान्हे फाटा ते सावळा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ८ कोटी रुपये, सोमाटणे ते कडधे रस्त्याची सुधारणा करण्यासाठी एक कोटी ३० लाख रुपये, एकवीरा देवी ते लोहगड रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, औंढे ते पाथरगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपये, माऊ ते डोंगरवाडी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी रुपये, कामशेत ते कोंडेश्वर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० हजार रुपये या कामांचा त्यात समावेश आहे. पावसाळ्यानंतर या कामांना सुरवात होऊन, पाच ते सहा महिन्यात ती पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. पूर्वीच्या सुमारे ६५ कोटी ५९ कोटी रुपये खर्चाच्या कामावरील स्थगिती उठल्याने तीही आता मार्गी लागतील. विकास कामांच्या निधीबरोबरच जनरल मोटर्स कामगारांचा रोजगाराचा प्रश्न, दरड ग्रस्त गावांचे पुनर्वसन, ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांसाठी आमदार निधीतून स्कूल बसची तरतूद, इंद्रायणी नदी प्रदूषण, रस्ते नादुरुस्त होण्याबाबत ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आदी बाबत अधिवेशनात आवाज उठवल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली.

प्रकल्पासाठी पाठपुरावा
पर्यटनाला चालना देण्यासाठी लोणावळा येथील टायगर व लायन्स पॉइंट येथे सुमारे ९५ कोटी रुपये खर्चाचा ग्लास स्काय वॉक प्रकल्प उभारणे, ग्रामीण खेळाडूंना चालना देण्यासाठी जांभूळ येथे १५ कोटी रुपये खर्चून क्रीडा संकुल उभारणे, तळेगाव दाभाडे येथे सुमारे तीस कोटी रुपये खर्चून नाट्यगृह उभारणे, वडेश्वर येथे १३ कोटी रुपये खर्चून मुलींसाठी वसतिगृह बांधणे, सुमारे ४० कोटी रुपये खर्चून डोणे - आढले उपसा जलसिंचन योजना करणे, नाबार्ड अंतर्गत वराळे ते नानोली इंद्रायणी नदीवर १३ कोटी रुपये खर्चून पूल बांधणे, कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर १४ कोटी रुपये खर्चून पूल बांधणे, सांगवडे ते मामुर्डी पवना नदीवर १३ कोटी रुपये खर्चून पूल बांधणे आदी कामांसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली.
-
प्रलंबित कामांना प्राधान्य
पुणे - मुंबई महामार्गावर कार्ला फाटा, कान्हे फाटा, वडगाव फाटा, लिंब फाटा, सोमाटणे फाटा, देहूरोड सेंट्रल हॉटेल आदी ठिकाणी उड्डाण पूल उभारणे, निगडे, आंबळे या औद्योगिक क्षेत्रातील इको सेन्सेटिव्ह झोन वगळणे, पवना धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन आदी प्रलंबित कामांसाठीही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित १४ महिन्यांच्या कालावधीत सुमारे चारशे ते साडे चारशे कोटी रुपयांचा निधी आणण्याचा निर्धारही आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

‘‘राज्याच्या विकासाचे धोरण लक्षात घेऊन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे
आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. मावळ तालुक्यातील आमदार, खासदार, माजी मंत्री हे सर्वच आता सत्ताधारी पक्षाचे झाल्याने मावळच्या विकासाला चालना मिळेल.
-सुनील शेळके, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com