निवडणूक विश्लेषण - मावळ  विधानसभा मतदार संघ

निवडणूक विश्लेषण - मावळ विधानसभा मतदार संघ

मावळ विधानसभा मतदारसंघ
-----------------------
युतीधर्म पालनावरच बारणेंची मदार

ज्ञानेश्वर वाघमारे ः सकाळ वृत्तसेवा
वडगाव मावळ, ता. १४ : लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य कोणाला मिळणार याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे सलग तिसऱ्यांदा तालुक्यातून आघाडी घेण्यास यशस्वी होतात की महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे बारणे यांच्या विरोधातील सुप्त नाराजीच्या लाटेचा फायदा घेण्यास यशस्वी ठरतात, याबाबत मोठी उत्सुकता आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यातच प्रमुख लढत होती. मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार मावळ विधानसभा मतदारसंघात ५५.४२ टक्के मतदान झाले. ही टक्केवारी २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी आहे. मात्र, मतदारांची वाढीव संख्या लक्षात घेता यावेळचे एकूण मतदान हे गेल्या निवडणुकीएवढेच म्हणजे सुमारे दोन लाख दहा हजारांच्या घरात आहे. कडक उन्हाळा व सायंकाळी काही भागात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला. दुसरी बाब म्हणजे बहुतांशी मतदार हे मतदानासाठी स्वतःहून मतदान केंद्रावर आलेले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसारखे कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह करून मतदानासाठी आणलेले नव्हते. राजकीय पक्षांच्या बुथवर दिवसभर ठाण मांडून बसलेले कार्यकर्ते पाहिल्यानंतर शहरी भागात ही बाब प्रकर्षाने जाणवली. दोन्ही उमेदवारांची भिस्त ही घटक पक्षांवर अवलंबून असल्याने त्यांची स्वतःची यंत्रणा जास्तीत जास्त मतदान करून घेण्यास कमी पडली. स्थानिक (मावळ तालुक्यातील) उमेदवार नसल्याने तालुक्यात शेवटपर्यंत निवडणुकीचा म्हणावा तसा माहोल तयार झालेला दिसला नाही. गाव पातळीवरील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या परीने प्रचारात सहभागी दिसले. शहरी भागात बारणे यांच्या प्रचारासाठी झालेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा वगळता दोन्ही बाजूकडून राज्य पातळीवरील कोणतेही मोठे नेते प्रचारासाठी मावळात आले नाहीत. कमी कालावधीमध्ये दोन्ही उमेदवारही प्रत्येक गावात प्रचारासाठी पोहचू शकले नाहीत. या बाबीचाही परिणाम मतदानाची टक्केवारी कमी होण्यात झाला. आता झालेल्या मतदानात मताधिक्य कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूकडील पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातून आघाडी मिळण्याचा दावा केला आहे.

घसरलेली गाडी पुन्हा रुळावर
मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वात प्रथम महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर झाली. महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे उमेदवारीसाठी अनेक दिवस वेटींगवर राहिले. दरम्यानच्या काळात त्यांना उमेदवारी देण्यास महायुतीचे तालुक्यातील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजपने तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची मानसिकताही बारणे यांच्या विरोधातील झाली. खासदारांच्या दहा वर्षांतील कामाचा मुद्दा मित्र पक्षांनीच अधोरेखित केल्याने नागरिकांमध्येही नकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत झाली. मात्र, अखेर बारणे यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याने व दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी युती धर्म पाळण्याचा आदेश दिल्याने स्थानिक नेत्यांचा बारणे यांना असलेला विरोध मावळला व त्यांनी एकत्रित पत्रकार परिषद व मेळावा घेऊन बारणे यांना विजयी करण्याचा संकल्प केला. बारणे यांनीही नाराज नेते व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. नेते एकत्र झाले तरी कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान पदाधिकाऱ्यांपुढे होते. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एकेक खासदार महत्त्वाचा असल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांपुढे बारणे यांचे काम करण्यावाचून पर्याय राहिला नाही. ‘अबकी बार चारसो पार’ ही भाजपच्या केंद्रातील नेत्यांची घोषणा तसेच राज्यात ४५+ ही महायुतीच्या नेत्यांची घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी धनुष्यबाणाचा प्रचार करण्यावाचून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पर्याय राहिला नाही.

मोठ्या नेत्यांच्या सभा नाही
मावळातील कार्यकर्त्यांमधील चलबिचल लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी कामशेत येथे सभा घेतली व कार्यकर्त्यांना बारणे यांचेच काम करण्याचा सज्जड दम दिला. नंतरच्या काळात दोन्ही पक्षातील स्थानिक नेते सक्रिय झाल्याने त्याचा काहीसा सकारात्मक परिणाम झाला व सुरुवातीच्या काळात एकदमच रुळावरून खाली घसरलेली बारणे यांची गाडी शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात रुळावर आली. मात्र, महायुतीच्या सर्व घटक पक्षातील तळागाळापर्यंतचे कार्यकर्ते युती धर्माचे तंतोतंत पालन करणार का हा कळीचा प्रश्न राहिला. दुसरीकडे बारणे यांच्या विरोधात तयार झालेल्या नकारात्मक सुप्त लाटेला हवा देण्यास महाविकास आघाडीची यंत्रणा काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही बाब प्रकर्षाने जाणवली. बारणे यांच्या बाजूला तालुक्यातील प्रबळ पक्ष व त्यांची गाव पातळीवरील यंत्रणा होती. त्या मानाने वाघेरे यांची यंत्रणा अतिशय अपुरी होती तरीही चर्चेत राहण्यात त्यांनी यश मिळवले. शहरी भागातील सर्वसामान्य मतदारांनी खासदार बारणे यांची की मोदी यांच्या केंद्र शासनाची कामगिरी पाहून मतदान केले ही बाबही महत्त्वाची आहे.

निकालाबाबत अंदाज वर्तविणे अवघड
मावळ तालुक्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप हे दोन प्रबळ पक्ष असून, त्यांची ताकद लक्षात घेता व दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी युती धर्माचे पालन करून काम केले असल्यास बारणे यांची स्थिती किमान ६०-४० टक्के अशी राहण्याची शक्यता आहे. युती धर्मात दगा फटका झाल्यास व सर्वसामान्य मतदार विद्यमान खासदारांबाबतच्या नाराजीच्या लाटेवर स्वार झाल्यास बरोबरी अथवा या उलट स्थिती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांचा उमेदवार नसल्याने या स्थितीचा आगामी काळात युतीवर परिणाम होणार नसला तरी संशयाचे वातावरण मात्र कायम राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com