प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी सुरू

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी सुरू

वडगाव मावळ, ता. ८ ः खरीप हंगामातील २०२४-२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी सुरु झाली असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता केवळ एक रुपया भरून पीक विमा अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी केले आहे.

तालुका कृषी अधिकारी पडवळ यांनी सांगितले की, ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. मावळ तालुक्यात भातासाठी संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी ५१ हजार ७६० रुपये, भुईमुगासाठी प्रति हेक्टरी चाळीस हजार रुपये व सोयाबीनसाठी प्रति हेक्टरी ४९ हजार रुपये एवढी आहे. त्यासाठी शेतकऱ्याने फक्त एक रुपया विमा हप्ता भरावयाचा आहे. या योजनेत मृत शेतकऱ्याच्या नावे विमा काढला गेल्यास तो प्रस्ताव रद्द करण्यात येईल. शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत १५ जुलै पर्यंत आहे.

योजनेची उद्दीष्ट्ये :
- नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे
- पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे
- शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण आणि सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे

नुकसान भरपाई केव्हा मिळणार ः
या योजनेअंतर्गत पुढील कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाईल.
- हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
- पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान
- पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट.
- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान
- नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान

नोंदणी करण्याचे ठिकाण
- आपले सरकार सुविधा महा ई सेवा केंद्र (csc)
- नजीकची राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक
- संकेतस्थळ www.pmfby.gov.in

आवश्यक कागदपत्रे
- बँक पासबुक
- ७/१२ उतारा
- आधार कार्ड
- पीक पेरा स्वयंघोषणापत्र

महत्त्वाच्या बाबी
- अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक.
- पीक विम्यासाठीचा अर्ज हा आधार कार्डवरील नावाप्रमाणेच असावा.
- आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे.

‘‘शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता या पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा बँकेच्या शाखा, राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा, नजीकच्या विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी
सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अथवा जवळचे सीएससी सेंटरशी संपर्क साधावा.’’
- दत्तात्रेय पडवळ, मावळ तालुका कृषी अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com