शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात शेतीवर भर द्यावा

शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात शेतीवर भर द्यावा

Published on

वडगाव मावळ, ता. ११ : मजुरांची कमतरता लक्षात घेता मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात शेतीवर भर द्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत आत्माचे प्रकल्प संचालक संजय काचोळे व प्रकल्प उपसंचालक श्रीधर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. वडेश्वर येथे प्रगतिशील शेतकरी तुकाराम लष्करी यांच्या शेतात यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक नुकतेच घेण्यात आले. त्याचा शुभारंभ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांच्या हस्ते करण्यात आला. मंडळ कृषी अधिकारी राजाभाऊ गायकवाड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोऱ्हाडे, कृषी सहाय्यक घनशाम दरेकर, सुनील वाव्हळकर, प्रगतशील शेतकरी नामदेव खांडभोर, सुरेश वाघमारे, श्रीकांत लष्करी आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

पडवळ यांनी सांगितले की, ‘मावळ तालुक्यातील खरिपाचे प्रमुख पीक भात आहे. भात शेतीसाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता जाणवत आहे. योग्य पाऊस झाला की प्रत्येक शेतकऱ्याची भात लागवाडीची लगबग सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात लागवडीचा अवलंब मोठ्या प्रमाणात करावा. यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे लागवड खर्चात बचत होते व योग्य वयातील रोपांची लागवड केल्यामुळे उत्पादनात वाढ होते.’

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे यांनी सांगितले की, ‘यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे होणारे फायदे पाहिल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात यांत्रिकी भात शेतीकडे वळत आहेत. त्यांना कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी वडेश्वर, नागाथली, माऊ इत्यादी गावांमध्ये यंत्राद्वारे भात लागवडीसाठी तयार केलेल्या रोपवाटिकांना भेटी देऊन संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.