युनेस्कोच्या पथकाची लोहगड किल्ल्याला भेट

युनेस्कोच्या पथकाची 
लोहगड किल्ल्याला भेट
Published on

वडगाव मावळ, ता. ३० : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकन मिळालेल्या मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याला सोमवारी युनेस्कोच्या पथकाने भेट देऊन गडावरील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली. स्थानिक अधिकारी व ग्रामस्थांशीही दुभाषाच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला.
छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांपैकी १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खांदेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. जागतिक वारसा यादीमध्ये स्थळांचा समावेश केल्याने देशाला गौरव प्राप्त होतो आणि ही स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. यामुळे या स्थळांच्या परिसरात आर्थिक विकासाला तसेच पर्यटनाला चालना मिळते.
मावळ तालक्यातील लोहगड हा त्यापैकी एक महत्वाचा किल्ला. युनेस्कोच्या पथकाने सोमवारी लोहगड किल्ल्याला भेट दिली. युनेस्कोच्या अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मांडवरे, राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वाहने, वन विभागाचे अधिकारी, प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात आदी उपस्थित होते. या पथकाने सुमारे साडे तीन तास गडाची पाहणी केली. त्यांनी गडावरील गणेश दरवाजा, महा दरवाजा, चोर दरवाजा, हनुमान दरवाजा, महादेव मंदिर, कबर, तटबंदी, त्रिंबक तलाव, सदर, शिवकालीन स्थळांचे अवशेष, लेण्या, घोड्यांचा तबेला, गडावरील सोळा कोनी पाण्याच्या तलाव, विंचू काटा सह गडावरील इतर व्ह्यू पॉइंट आदींना भेट देऊन पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक ठिकाणाची माहिती व इतिहास जाणून घेतला व काही सूचनाही केल्या.

स्थानिकांशी संवाद
गडावरील पाहणीनंतर त्यांनी छावणी हॉटेलमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था व ग्रामस्थांशी दुभाषाच्या माध्यमातून संवाद साधला. गडावरील हवामान, पर्जन्यमान, वनस्पती आदी बाबींची त्यांनी माहिती घेतली. युनेस्को पथकाच्या भेटीच्या अनुषंगाने काही गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहितीही ग्रामस्थांनी दिली. स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

लोहगड : युनेस्कोच्या पथकाने सोमवारी स्थानिक अधिकाऱ्यांसह गडाला भेट देऊन गडावरील विविध ठिकाणांची माहिती घेतली.
लोहगड : युनेस्कोचे पथक सोमवारी लोगडावर आले असता अधिकाऱ्यांचा सत्कार करताना स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com