नायगाव ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
वडगाव मावळ, ता.९ : जुना मुंबई-पुणे महामार्ग असुरक्षित रहदारीमुळे मृत्यूचा सापळा बनला असून येथे सेवा रस्ते, योग्य ठिकाणी क्रॉसिंग आदी सुरक्षा विषयक उपाय-योजना कराव्यात तसेच अपघातामधील मृत्युमुखी पडलेल्या गणेश चोपडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी अन्यथा १४ तारखेला रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा नायगावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.
तहसीलदार, रस्ते विकास महामंडळ, पोलिस अधिकारी आदींना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, नायगाव येथून जाणारा जुना मुंबई-पुणे महामार्ग हा अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे. रस्त्याने आतापर्यंत अनेक जणांचे बळी घेतले आहेत. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासनाला जाग आलेली नाही. नायगाव अपघाताची पोलिसांनी चौकशी करून वाहन चालकास आणि मालकास योग्य ती कायदेशीर कारवाई करुन नुकसान भरपाई वसुल करावी. मृत गणेश चोपडे हा घरातील कर्ता पुरूष होता. त्यांची मुले पूर्णपणे निराधार झालेली आहेत. त्यांचे पालन पोषण, भविष्यातील उर्वरित आयुष्याचा उदर निर्वाहाचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने रस्ते महामंडळाकडून, आमदार, खासदार तसेच शासनाकडून योग्य ते सहकार्य व आर्थिक मदत करण्यात यावी.’’ बाबाजी चोपडे, अतुल चोपडे, अंकुश चोपडे, महेश चौधरी, प्रसाद चोपडे, दिलीप वावरे, लहू वावरे, संतोष कदम, नागेश चोपडे, अरिफ मुलाणी, योगेश चोपडे, अक्षय फाटक आदींनी हे निवेदन दिले आहे.
काय आहेत समस्या ?
- रस्त्यावर क्रॉसिंगच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गतिरोधक नाहीत.
- वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था नाही.
- सेवा रस्त्याचा अभाव; शाळकरी मुले, कामगार वर्ग, ग्रामस्थ व जनावरे यांची धोकादायकरित्या ये-जा
- नायगावच्या मरिमाता मंदिरासमोर व ‘टोनी दा ढाबा’ येथील क्रॉसिंगवर (छेद मार्ग) चढ-उतार
- वाहनाला नियंत्रित करणे अशक्य. परिणामी, वाहन चढावरून मागे रस्त्यावर जाऊन अपघात.
- ‘टोनी दा ढाबा’ समोरील क्रॉसिंग उताराचे असल्याने पुण्याकडून मुंबईकडे वाहने भरधाव.
- पुण्याहून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे, क्रॉसिंग बंद करून योग्य ठिकाणी सुविधा हवी.
- ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी दुतर्फा सेवा रस्ता हवा.
कामशेत, कान्हेच्या शाळकरी मुलांत भीती
या महामार्गाने आजपर्यंत अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतलेला आहे. त्यामुळे, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कामशेत व कान्हे येथे शाळेसाठी पायी जाणारी मुले देखील या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी घाबरत असून त्यांच्या मनात भीती बसलेली असल्याने ते शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे, त्यांचे शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

