वर्धापन दिनाच्या मावळ पुरवणी साठी लेख

वर्धापन दिनाच्या मावळ पुरवणी साठी लेख
Published on

मावळची हवा एक वरदान !

उत्तुंग डोंगररांगा, खळखळणारे, झुळझुळणारे झरे, हिरव्यागार वनश्रीने नटलेला भूभाग आणि या सगळ्यांत डोळ्यांना न दिसणारी पण मायेची पाखरण करत निरोगी आयुष्याचे दान देणारी आल्हाददायक ‘मावळची विशुद्ध हवा आणि हवामान’ याची सर कशालाच नाही. राजकीय, सामाजिक वातावरण कितीही तापलेले असले तरी सदैव शीतल व आल्हाददायक असणारे वातावरण हे मावळ तालुक्याला लाभलेले एक वरदान होय.
- साक्षी जोगळेकर

का ही दिवसांपूर्वी एक बातमी कानावर आली, ती म्हणजे दिल्ली शहरातील प्रदूषणाबाबत. बातमी ऐकून मन अगदी विषण्ण झाले; आणि मनात विचार आला की, जरा जरी हवेवर फिरले, तर मनाला आणि शरीराला बरं वाटतं, असे जाणणारे आपण आणि क्षणात भय वाटलं जर ती हवाच विशुद्ध नसेल तर? दिल्ली, मुंबई, पुणे यासारख्या शहरात सध्या प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशात मग शोध सुरू होतो तो स्वच्छ आणि शुद्ध हवेचा.
हवेली, पुणे, मुळशी, कर्जत अशी साधारण चतुःसीमा असणारा बारा मावळातील शिवरायांच्या पदस्पर्शाने तथा अनेकविध ऐतिहासिक संदर्भांसाठी प्रसिद्ध असणारा हा ‘मावळ तालुका’ आणखी एका बाबींसाठी प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे इथली ‘शुद्ध हवा’, इथले मोकळे वातावरण. लोणावळा, खंडाळा यासारखी प्रमुख आणि प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे असणारा असा हा मावळ तालुका. येथील हवा फक्त लोणावळा-खंडाळा पुरतीच थंड आणि आल्हाददायक नाही तर संपूर्ण तालुक्यावर तिच्या शुद्धतेचा प्रभाव आहे. पुण्याकडून येताना भक्ती-शक्ती चौकातून पुढे आले की, नवख्या माणसालाही हवेतील बदल जाणवतो. तसेच, लोणावळा-खंडाळा मार्गे घाट उतरला की वातावरणात झालेल्या बदलाची जाणीवही तितक्याच तीव्रतेने होते.
मावळची ही हवा फक्त आल्हाददायकच नाही तर बरेच आजार बरे करण्याची क्षमता असणारी आरोग्यदायिनी देखील असल्याने अनेक मंडळी हवामान बदलासाठी मावळचे नाव अग्रक्रमाने घेतात. पावसाळा, हिवाळा यांचा भरभरून आस्वाद देणारे मावळ, उन्हाळ्यातही तितक्याच आवेशाने थंडावा देऊ करते. सह्याद्रीच्या डोंगररांगा, दऱ्याखोऱ्या आणि पाण्याचे नैसर्गिक जलाशय, औषधी वनस्पतींसह नैसर्गिक सौंदर्यांची उधळण करणारी वनराई उत्तम वातावरणाचे द्योतक आहेत आणि इथले उत्तम वातावरण इथल्या चराचरांसाठी अनुरूप आहे. सृष्टी आणि वृष्टी या दोहोंच्या परस्पर सहकार्यानेच मावळवासीयांना स्वर्गीय वातावरणाची अनुभूती येते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

येथील भातशेती, हिरव्यागार रानभाज्या आणि पालेभाजी, कडधान्य यासाठी अनुकूल हवामान असल्यामुळे भात शेतीचे तथा पूरक, हंगामी, कडधान्य आणि भाजीपाला या शेतीचे प्रमाण जास्त आहे. त्यातल्या त्यात इंद्रायणी आणि आंबेमोहोर हे भाताचे प्रकार अग्रेसर आहेत.
मावळच्या या विशुद्ध हवेने, कसदार मातीने अनेकविध खेळाडूही घडवले आहेत आणि भविष्यातही घडवत राहील. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविण्याचा मान आणि विक्रम मावळच्या मातीने प्राप्त केलेला आहे. अलीकडे पर्यटन विकास अशा महत्वाकांक्षी योजना सर्वच स्तरावर चर्चिली जात असून, या योजना नैसर्गिक सौंदर्यात हस्तक्षेप न करता राबवल्या जाव्यात इतकीच इच्छा वाटते. कारण सरतेशेवटी माणसाने कितीही प्रगती केली तरी, उत्तुंग डोंगररांगा, अवखळपणे खळखळणारे, झुळझुळणारे झरे, हिरव्यागार वनश्रीने नटलेला भूभाग आणि या सगळ्यांत डोळ्यांना न दिसणारी पण मायेची पाखरण करत निरोगी आयुष्याचे दान देणारी आल्हाददायक ‘मावळची विशुद्ध हवा आणि हवामान’ याची सर कशालाच नाही. राजकीय, सामाजिक वातावरण कितीही तापलेले असले तरी सदैव शीतल व आल्हाददायक असणारे वातावरण हे मावळ तालुक्याला लाभलेले एक वरदान होय.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com