मावळच्या मातीचं खरंखुरं ‘देणं’ किंवा मावळातील देखण्या लेण्यांचं ‘देणं’

मावळच्या मातीचं खरंखुरं ‘देणं’ 
किंवा
मावळातील देखण्या लेण्यांचं ‘देणं’
Published on

‘लेणी’ म्हटलं की चटकन काय आठवतं? तर सह्याद्रीच्या पर्वतरांगा, गडकिल्ले आणि अजिंठा-वेरूळ आणि मग कार्ला-भाजे आणि बेडसे तथा घोरवडेश्वर, बरोबर ना? मग, आठवतात अप्रतिम शिल्पकला, बौद्ध भन्ते, जैन मुनी आणि त्यांचे विचार-आचार आणि उत्तम व्यवहार ! वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना, दान पारमितेचा वारसा जतन करीत सर्वसामान्यापासून ते वास्तुविशारद, इतिहास संशोधक, पर्यटक, परदेशी पाहुणे, कलावंत यांना सतत निखळ आणि व्याकुळ करणाऱ्या बौद्धकालीन लेण्या मावळच्या मातीचं खरंखुरं ‘देणं’ अन् ‘लेणं’ आहेत.
- दीपक भालेराव
-------------------
जगातली सर्वोत्तम भूमी म्हणून भारताने जगाचे कायम लक्ष वेधले आहे. कारण, इथल्या भूमीने जगाला सर्वोत्तम भूमिपुत्र देऊन विश्व कल्याणाची लोकशाही प्रधान भूमिका आणि तिचा वारसा कायम जागृत ठेवला आहे. विचार आणि वारसा हे आमच्या राष्ट्रीय जीवनाचे सृजन संचित आहे. जगाने नतमस्तक होऊन भारताला पुण्यभूमी म्हणून हजारो वर्षांपासून डोईवर घेतलेले आहे, गौरविले आहे.
सर्वोत्तम विचारांचा वारसा, सर्वोत्तम विचारांचे ध्यान, चिंतन, मनन व्हावे यासाठी तत्कालीन संस्कृतीने निर्माण केलेल्या शिल्पकलेचा आविष्कार म्हणजे लेण्या. मावळात बौद्ध, जैन आणि हिंदू लेण्यांचा समावेश प्रामुख्याने होतो. त्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी, महापुरुष आणि युगपुरुष यांची कर्मभूमी. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या संदेशाला अंतरंगात स्थापित करण्यासाठी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून अव्याहतपणे वैविध्यपूर्ण लेण्या संस्कृतीचा मूळ वारसा उद्घोषित करत तो जपण्याचे कार्य करत आहेत.

इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या मावळ तालुक्यातील लोणावळा-मळवली पासून काहीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कार्ला-भाजे-बेडसे-घोरवडेश्वर, भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर या ‘मावळच्या लेण्या’बाबत आपण माहिती घेणार आहोत.
लोणावळा, मळवलीपासून ४ ते ५ किलोमीटरवर असणाऱ्या या लेण्या. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे या लेण्यांवरील ‘आनंद तरंग’ आजही तुमच्या आमच्या मनात आनंदाची अनुभूती देण्यास वाटेकडे डोळे लावून आहेत. पण, आम्हाला वेळ कुठे आहे ? शुद्ध आहार, शुद्ध विहार याला दुरापास्त झालेल्या मानवाला ‘याची देही याची डोळा’ भरभरून आनंद मुक्त हस्ते बहाल करणाऱ्या लेण्या म्हणजे आमच्या आनंदाचे गूढ आहे. तत्कालीन कला, संस्कृती, व्यापार, अधिवास, शिक्षण, ध्यान आणि उपासनेच्या केंद्रबिंदू म्हणून साक्ष देणाऱ्या या ‘लेण्या’ शुद्ध हवा, वातावरणाची आजही ग्वाही देत आहेत.

स्थापत्य शास्त्राचा आविष्कार
येथील चैत्यगृह ही चित्ताला सन्मार्गावर मार्गस्थ करण्याची व एकाग्रता साधण्याची माहेरघरे आहेत. येथील शिल्पकला स्थापत्य शास्त्राचा सर्वोत्तम आविष्कार आहेत. विहार आणि चैत्यगृहात वापरलेले लाकडाचे तसेच शिल्पातील कोरीव काम अवर्णनीय आहे. येथे येणारा प्रत्येकजण आपले मानवी विचारचक्र प्रवर्तन करीत मोकळ्या श्वासाची अनुभूती घेतो. येथील प्रत्येक अनुभूती हृदयस्पर्शीच आहे. वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना, दान पारमितेचा वारसा जतन करीत सर्वसामान्यापासून ते वास्तुविशारद, इतिहास संशोधक, पर्यटक, परदेशी पाहुणे, कलावंत यांना सतत निखळ आणि व्याकुळ करणाऱ्या बौद्धकालीन लेण्या मावळच्या मातीचं खरंखुरं ‘देणं’ अन् ‘लेणं’ आहेत.

संविधानिक आणि राष्ट्रीय नीतीने विविध लेणी संवर्धन संस्था कार्यरत आहे. त्यासाठी त्यांना अनेकानेक धन्यवाद आणि शुभेच्छा ! त्याचबरोबर इथले गडकिल्ले आमच्या पराक्रमाची साक्ष आहेत; तर लेण्या आमच्या मनःशांतीचे प्रतीक. शासनाने ही सगळी देदीप्यमान विचारपीठे आपल्या देखरेखीत घेऊन या देखण्या लेण्यांचं सौंदर्य अजूनच खुलवले आहे. तेव्हा, चला आपल्या कुटुंबासमवेत आपला
सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी सतत प्रयाण करूयात.. कधी लेण्या तर कधी गड-किल्ले फिरूयात !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com