

वडगाव मावळ, ता. १० ः मावळ तालुक्यातील विसापूर गडाच्या पायथ्याशी मालेवाडी शेजारी ‘सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान’ या संस्थेने उभारलेल्या मंदिरात बजरंग बलीच्या मूर्तीची (ता. १०) रविवारी प्रतिष्ठापना व मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. नाणे व पवन मावळच्या सीमेवर असलेल्या मालेवाडी गावाशेजारी विसापूर गडाच्या पायथ्याशी झाडाझुडपांत बजरंग बलीची एक मूर्ती व प्राचीन मंदिराचे दगड विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले होते. सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेच्या दुर्ग सेवकांनी येथे सुंदर मंदिर बांधले आहे. शुक्रवारी (ता.७) विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शनिवारी (ता.८) मशाल महोत्सव, शिवपूजा जलाभिषेक, सामुदायिक हरिजागर आदी कार्यक्रम झाले. रविवारी (ता.९) सकाळी महापूजा व पालखी मिरवणूक काढण्यात आली. येथील बजरंग बलीच्या मूर्तीची नियमित पूजा करणारे बबन बैकर यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. इतिहास संशोधक प्रमोद बोऱ्हाडे यांचे व्याख्यान झाले. त्यांनी विसापूर म्हणजेच संबळगडाच्या इतिहासाची माहिती दिली. आमदार सुनील शेळके, सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिन शेडगे, वन्यजीवरक्षक नीलेश गराडे, अनिल आंद्रे, रामनिवास गुप्ता, विनायक जाधव, अनिल काकडे, अमोल थोरवे, किरण हुलावळे, राम केदारी, अनिल साबळे, सोमनाथ शिंदे, विश्वनाथ पुट्टूल, ललित धुमाळ आदी उपस्थित होते. आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘‘विसापूर किल्ल्यासह तालुक्यातील इतर किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. मंदिराच्या आवारात सोलर दिवे व मंदिरासमोर दीपमाळ लावून देण्यात येईल. तसेच, यावेळी ‘सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान’ च्या मावळ्यांचे कौतुक केले. दुर्गसंवर्धनाच्या कार्यात मी निधी उपलब्ध करून देईन. सर्वोत्तम काम करून घ्यायची जबाबदारी तुमची असेल असे त्यांनी सांगितले.’’
नूतन मंदिराला फुलांचा साज
पूर्वी एक बजरंगबलीची मूर्ती व आजूबाजूला प्राचीन मंदिराचा झाडाझुडपातील भग्नावस्थेतील चौथरा अशी स्थिती त्याठिकाणी होती. मात्र आता सुंदर मंदिर उभे राहिल्याने परिसराची शोभा वाढली आहे. प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त दगडांचे बांधकाम असलेल्या या मंदिराला विशिष्ट प्रकारचा रंग देण्यात आला आहे. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी मंदिर सजविण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.