मावळातील पाच शिलालेख प्रकाशात

मावळातील पाच शिलालेख प्रकाशात
Published on

वडगाव मावळ, ता. ३० : मावळ तालुक्यातील करंजगाव, नायगाव, वडेश्वर येथील शिलालेख प्रकाशात आले आहेत. याबातचे संशोधन इतिहास अभ्यासक प्रमोद बोऱ्हाडे व दीपक पटेकर यांनी केले आहे. त्यामुळे इतिहासातील अनेक घटनांवर नव्याने प्रकाश टाकला जाणार आहे. वरील तिन्ही ठिकाणी चौरसाकृती बारव असून त्यावर पाच शिलालेख देवनागरी लिपी व मराठी तसेच संस्कृत भाषेत उपलब्ध आहेत.

करंजगाव : पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात कर्वे यांना नाणे मावळातील करंजगाव येथे करमुक्त जमीन वंशपरंपरेने इनाम देण्यात आली. करंजगाव-ब्राह्मणवाडी येथे निर्मिलेल्या बारवेच्या उतरणाऱ्या पायऱ्यांच्या भिंतीवर तीन ओळींचा शिलालेख आहे.

‘‘शके १६८२ विक्रम संवत्सरे श्रीकाळभैरव
हरिहरेश्वर चरणी तत्पर समस्त कर्वे
निरंतर शेवेस माणकोजी पापळ’’
सदर बारव १७६०-६१ मध्ये अर्थात पानिपत युद्धाच्या काळातील असून बांधकामाची देखरेख करणारे पापळ हे आडनाव असणारे घराणे बहुधा मावळातील नवलाख उंब्रे गावातील असावे. तसेच कर्वे घराणे हे मूळ कोकणचे हरिहरेश्वर येथील. ते भट घराण्याचे कुलाचार्य म्हणजे कुलोपाध्ये होते. पेशव्यांचे महत्त्वपूर्ण समारंभ तसेच बारसे, मुंज, लग्न, पूजा आदी धार्मिक विधी कर्वे-उपाध्ये करत असत.

वडेश्वर : येथील बारवेत पायऱ्यांच्या डाव्या-उजव्या दोन्ही बाजूंस कोरीव शिलालेख आहेत.
यातील शिलालेखात बरीचशी अक्षरे अस्पष्ट आहेत. त्यामुळे त्या ओळींचा अर्थ पूर्णपणे सहज लक्षात येत नाही. पण, कर्वे घराण्याच्या मूळगावाचा उल्लेख ‘हरिहरे क्षेत्र’ म्हणून आलेला आहे.
येथील दुसऱ्या शिलालेखात पाच ओळी आहेत.
१) श्री
२) ॥ स्वस्ती श्रीमन्नृपशालिवाहन शके १६९१ विरोधी सं ॥
३) ॥ वत्सरे माघ शुक्ल पंचमी बुधवासरे तद्दीने श्रीहरी॥
४) ॥ हर क्षेत्रस्थ करवे इत्यापाभिध श्रीधर भद्रेन इयं वापिका बंधनोत्सर्ग: ॥
५) ॥ कृत:॥
इसवी सन १७७५-७६ मध्ये हरिहर क्षेत्राच्या कर्वे उपनाम धारण केलेल्या श्रीधर भट यांनी या बारवेची निर्मिती केली. असा या शिलालेखाचा आशय आहे.


नायगाव : येथील शिलालेखात संस्कृत भाषा तसेंच देवनागरी लिपीचा वापर करण्यात आला आहे.
१) श्रीगजानन ॥ शार्केगग्रहशास्रभूपरिमितेसंवत्सरेमन्माधवराय
२) भूपति वराण सेकुल चार्यक: ॥ कर्वोपाभिधदिव्यभट्टतनुजोधर्मार्थबुध्या
३) खनीमार्गेपीधतनतूबोधरामनीनाद्यतनावापिकी ॥ प्रारंभ:॥
सदर शिलालेखात कालोल्लेख ‘शब्द मूल्य’ स्वरुपातील असून अग - ७, ग्रह - ९, शास्त्र -६, भू - १ याचे उलट वाचन केल्यास १६९७ शक वर्षांक कळतो. यात ७८ मिळविले की, इसवी सन १७७५ मध्ये या बारवेची निर्मिती देव भट कर्वेंच्या मुलाने सुरू केले, असे कळते. या शिलालेखातील माधवराय म्हणजे सवाई माधवराव पेशवे होय.

येथील दुसऱ्या शिलालेखातील मजकूर -
१) श्रीगजानन ॥ स्वस्तिश्रीखखसप्तभूमितशकेराधे
२) कतिथ्यांसितेपक्षेभानुदिनेविलंबिनिशुभेसंवत्सरेजीवथं॥
३) कर्वेइत्युपनामकोहरिहरक्षेत्रस्थसद्बुत्धिमांश्चक्रेवापिममुंज
४) नार्दनातिख्यात: शिवप्रीतये ॥ श्रीकाशीविश्वेश्वरार्पण
५) मस्तु॥

शिवाला प्रिय असणाऱ्या हरिहर क्षेत्राचे विद्वान, कर्वे उपनाम असलेल्या विख्यात जनार्दन भट यांनी ही वापी निर्मिली. यातील ख-०, सप्त-७, भू-१ या शब्दमूल्यांचे उलट वाचन केल्यास १७०० असा शक वर्षांक कळतो. इसवी सन १७७८ मध्ये हे बारवेचे काम पूर्ण झाले असे निदर्शनास येते.


- कोट १ -

उपरोक्त पाचही शिलालेख मावळचा इतिहास कथन करणारे इतिहासाचे बोलके साक्षीदार आहेत. प्रवासी मार्गावरील या बारवांचा उपयोग पिण्याच्या पाणी तसेच शेती वगैरे अन्य वापरासाठी होत होता. या जलसाठ्यांना आजही जिवंत झरे असून ते लोकोपयोगी आहेत.
-प्रमोद बोऱ्हाडे, इतिहास अभ्यासक

- कोट-२
या शिलालेखामुळे मावळातील कर्वे घराण्याचे स्थलांतर, वसाहत निर्मिती, आर्थिक भरभराट, धर्मार्थ कार्य यासोबत मावळच्या स्थानिक इतिहासावर प्रकाश पडतो आहे. इतिहासाचे स्मरण या शिलालेखांच्या माध्यमातून पुनःश्च होत आहे.
- दीपक पटेकर, इतिहास अभ्यासक

फोटोओळ
करंजगाव : येथील मध्ययुगाची साक्ष देणारी बारव
नायगाव : येथील बारावावरील शिलालेख
वडेश्वर : येथील बारवावरील शिलालेखाचा मजकूर वाचताना इतिहास अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com