करवसुलीसाठी आता जप्तीची कारवाई

करवसुलीसाठी आता जप्तीची कारवाई
Published on

वडगाव मावळ, ता. ४ : ‘‘वर्षानुवर्षे मिळकत कराची थकबाकी असलेल्या सुमारे ५० सदनिकांना वडगाव नगरपंचायतीने जप्ती पूर्वीच्या नोटिसा पाठवल्या असून, तीन दिवसांत कर न भरल्यास मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव केला जाईल व कर जमा करून घेण्यात येईल,’’ अशी माहिती वडगाव नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
वडगाव नगरपंचायतीची २०२४-२५ या वर्षातील घरपट्टीची चालू व थकीत मिळून नऊ कोटी रुपयांची तर पाणी पट्टीची चालू व थकीत मिळून १ कोटी ४६ लाख रुपये अशी दोन्ही मिळून १० कोटी ४६ लाख रुपयांची मागणी होती. ३१ मार्च २०२५ पर्यंत त्यातील सहा कोटी १५ लाख रुपयांची (५८ टक्के) वसुली झाली. वडगाव नगरपंचायतीची स्थापना २०१८ मध्ये झाली. वडगाव नगरपंचायतीची चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्यापूर्वी शहरातील सात हजार ८०० मिळकतींची नोंद होती व कराची वार्षिक मागणी तीन कोटी वीस लाख रुपये होती. त्यानंतर प्रथमच २०२३-२४ पासून वडगाव नगरपंचायतीची चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्यात आली. ती पूर्ण झाल्यानंतर १२ हजार ५६२ मिळकतींचा सर्वे झाला व चालू कराची मागणी ५.६३ कोटी रुपये वाढली. त्यात थकबाकी मिळून २०२४-२५ मधील कराची मागणी १० कोटी ४६ लाख रुपये झाली.
कर भरण्यास विलंब करणाऱ्या मिळकत धारकांना जानेवारीपासून दोन टक्के व्याज आकारण्यात आले. या वसुलीसाठी मार्च महिन्यात पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी घरोघरी जाऊन कर भरण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले. दाद न देणाऱ्या १२७ मिळकत धारकांचे नळजोड तोडण्यात आले.
वडगाव शहरात लहान मोठे मिळून सुमारे शंभर अपार्टमेंट असून, काही अपार्टमेंटमधील सदनिकांमध्ये कोणीही राहत नसल्याने कर वसूल करणे शक्य होत नाही. परंतु आता ज्या सदनिकांची वर्षानुवर्षे थकबाकी आहे. अशा सुमारे ५० सदनिकांना जप्ती पूर्वीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना कर भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. संबंधित सदनिकाधारकांनी तीन दिवसांत कर न भरल्यास मालमत्ता जप्त करून लिलावात विकण्यात येणार आहेत व कर जमा करून घेण्यात येणार आहे. शहरातील काही नागरिकांनी ग्रामपंचायत काळापासून तर काहींनी कोरोना काळापासून कराचा भरणा केलेला नाही. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. शहरात सुमारे ४० चाळी असून, त्या भाड्याने दिल्या आहेत. कर भरण्याबाबत घरमालक व भाडेकरू एकमेकांकडे अंगुली निर्देश करत आहेत. कराचा भरणा करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अनेक सदनिका धारक व चाळ मालकांनी अनधिकृतपणे नळजोड मात्र घेतलेले आहेत. या सर्वांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याची माहिती डॉ. निकम यांनी दिली.

घरबसल्या भरता येणार कर
नगर पंचायतीच्या वतीने नागरिकांना घर बसल्या कर भरता यावा यासाठी सोप्या पद्धतीने व्हॉट्सॲप चॅटबॉट, माझं वडगाव ॲप यासारख्या ऑनलाइन कर भरणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच www.npvadgaon.in या वेबसाइटवर जाऊनही वॉर्ड नंबर व मालमत्ता क्रमांक टाकून गुगल पे, फोन-पे, युपीआय पेमेंट तसेच क्रेडिट कार्ड, डेबीट कार्डनेसुद्धा कर भरणा करू शकतात. या सुविधांचा वापर करून नागरिकांनी लवकरात लवकर आपल्या कराचा भरणा करावा. दंडात्मक व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.

सदनिकाधारकांनी लवकरात लवकर कर भरावा व कारवाई टाळावी. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ता धारकांना वडगाव नगरपंचायतीकडून कोणतीही सेवा व दाखले देण्यात येणार नाहीत. जप्ती पूर्वीच्या नोटिसा दिलेल्या मालमत्ता धारकांनी कर भरला नाही तर जप्तीची कारवाई करण्यात येईल.
- डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com