बेपर्वा प्रशासन आणि बेफिकीर पर्यटनाचे ‘बळी’

बेपर्वा प्रशासन आणि बेफिकीर पर्यटनाचे ‘बळी’
Published on

ज्ञानेश्वर वाघमारे ः सकाळ वृत्तसेवा
वडगाव मावळ, ता. १६ ः गेल्या सात-आठ वर्षांत लोणावळा-खंडाळा या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांप्रमाणेच ग्रामीण भागातही पावसाळी पर्यटन बहरले आहे. त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध झाला आहे. मात्र, या पर्यटन स्थळांवर मूलभूत सुविधा व सुरक्षा विषयक उपाययोजनांची वानवा असल्याने दरवर्षी दुर्घटना घडत आहेत. त्यात पर्यटकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अर्थात याला काही प्रमाणात पर्यटकांची बेफिकिरीही जबाबदार आहेच. परंतु, तालुक्यात पर्यटन विकासाची असलेली मोठी संधी लक्षात घेऊन आवश्यक त्या सोयी सुविधा तातडीने राबविण्याची गरज आहे. त्याच बरोबर पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित वातावरण तयार करण्याची गरज आहे.
मावळ तालुका हा निसर्ग सौंदर्याने समृद्ध व नटलेला तालुका आहे. येथे नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा असलेली अनेक ठिकाणे आहेत. ही देशी व परदेशी पर्यटकांची आकर्षणाची केंद्रे आहेत. पर्यटनासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध असलेली लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे, जगप्रसिद्ध कार्ला, भाजे, बेडसे, कांब्रे लेणी, कार्ल्याची एकवीरा देवी, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची हे किल्ले ही परिचित पर्यटन स्थळे आहेतच. परंतु, गेल्या काही वर्षात नवीन ठिकाणांचा शोध घेण्याच्या पर्यटकांच्या हौसेतून ग्रामीण भागात पावसाळी पर्यटन मोठ्या प्रमाणावर बहरले आहे. ग्रामीण भागात डोंगर दऱ्यातून फेसाळते धबधबे; हिरवीगार भात खाचरे, दुथडी भरून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, आंद्रा, सुधा, कुंडलिका नद्या; पवन मावळातील पवना, नाणे मावळातील शिरोता व वडिवळे, आंदर मावळातील ठोकळवाडी, आंद्रा, जाधववाडी, पूर्व पवन मावळातील कासारसाई आदी धरण जलाशय पर्यटकांना आकर्षित करतात. कुंडमळा येथील इंद्रायणी नदीतील रांजण खळग्यांवर गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची मोठी वर्दळ वाढली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तर गर्दीचा कळस गाठला जातो.

स्थानिकांना रोजगार
पावसाळी पर्यटन वाढल्याने स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. परिसरातील छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक, हातगाडीवर गरमागरम चहा, वडा पाव, भाजलेली मक्याची कणसे, भुईमुगाच्या शेंगा आदी खाद्य पदार्थांची विक्री करणारे छोटे व्यावसायिक, फेरीवाले, शहरातील हॉटेल, लॉजिंग व स्नॅक सेंटर्स, चिक्की व्यावसायिक, रिक्षा व टुरिस्ट वाहनचालक, देहूरोड ते लोणावळा दरम्यानचे महामार्गावरील हॉटेल व्यावसायिक या सर्वांना पावसाळी पर्यटनाचा मोठा फायदा होत आहे. छोट्या मोठ्या व्यवसायातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व धरणग्रस्तांच्या मुलांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे.

सुरक्षा उपाय योजनांची गरज
वाढत्या पर्यटकांच्या तुलनेत मूलभूत सुविधांची व सुरक्षाविषयक उपाययोजनांची वानवा असल्यामुळे मावळात पर्यटकांची गैरसोय होत आहे. दुर्घटनाही घडत आहेत. लोणावळा शहरांमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील रस्ते अरुंद असल्याने सुट्टीच्या दिवशी पर्यटकांच्या वर्दळीमुळे तेथेही वाहतूक कोंडी होत आहे. वाहने पुढे मागे घेण्याच्या कारणावरून स्थानिकांबरोबर वादाचे प्रसंग घडत आहेत. गेल्या काही वर्षात भुशी धरण, तुंगार्ली धरण, पवना धरण, पवना नदी; कुंडमळा येथील इंद्रायणी नदीमध्ये बुडून अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ढाकचा भैरी, ड्युक्स नोज, गड किल्ले व धबधब्यांच्या ठिकाणी दऱ्या खोऱ्यात पडून काही पर्यटकांना प्राण गमवावे लागले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन पर्यटन स्थळी अधिकाधिक सुरक्षा विषयक उपाययोजनांची गरज आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे, गड किल्ल्यांवरील घाट रस्त्यांची सुधारणा करणे, पर्यटकांसाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावणे, धोकादायक ठिकाणी धोक्याची जाणीव करून देणारे फलक ठळकपणे लावणे, सुरक्षारक्षक अथवा पोलिस बंदोबस्त तैनात करणे, पाण्याच्या ठिकाणी आवश्यक साधने व जीवरक्षक नेमणे, बचाव पथके व स्वयंसेवक नेमणे, मोडकळीस आलेले व धोकादायक बनलेले साकव, पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे प्रतिबंधित
करणे आदी उपाययोजना केल्यास दुर्घटनांना निश्चितपणे आळा बसू शकेल.

पर्यटकांनीही खबरदारी घ्यावी
पोलिस व प्रशासनाकडून अनेकदा पर्यटनस्थळी निर्बंध घातले जातात. परंतु अनेक पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालतात. स्थानिकांनी केलेल्या सूचना पाळत नाहीत. विशेषत: तरुणाई माहिती नसलेल्या अपरिचित ठिकाणी धोका पत्करून नको ते साहस करतात. फोटोग्राफी, सेल्फी काढण्याच्या तसेच रिल्स बनविण्याच्या नादात जीव धोक्यात घालतात. काही पर्यटक मद्यपान करून हुल्लडबाजी करतात व स्थानिकांशी वाद घालतात. आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने पर्यटकांनी योग्य काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद लुटावा. प्रशासनाला सहकार्य करावे. त्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे. अनोळखी ठिकाणी जाऊन जीवन धोक्यात घालू नये.

हलगर्जीपणामुळे कुंडमळा दुर्घटना
कुंडमळा (इंदोरी) येथील इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळण्याची घटना ही पर्यटकांसह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. हा पादचारी साकव सुमारे ३५ वर्षांपूर्वी बांधलेला असून मुदत संपून त्याची दुरवस्था झाल्याने तो दळणवळणाच्या दृष्टीने धोकादायक व अडचणीचा बनला होता. ही बाब प्रशासनाला माहीत असूनही त्यांनी ती गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. कारण या पुलाचा वापर होऊ नये या दृष्टीने तेथे ठोस उपाययोजना केलेली नव्हती. विशेष म्हणजे या साकव पूल सार्वजनिक बांधकाम खात्याचा की जिल्हा परिषद बांधकाम खात्याचा याबाबत स्पष्टता नाही. कारण दोन्ही विभाग हा आमचा नाही म्हणून हात झटकत आहेत. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक होता तर त्याचा वापर पूर्णपणे थांबविण्याची गरज होती. गेल्या सात आठ वर्षांपासून पुलाची ही स्थिती असताना येथे यापूर्वीच पर्यायी व्यवस्था होणे गरजेचे होते. पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन येथे नवीन पुलाला मंजुरी मिळाली आहे. आता जुना पूल पडल्याने पंचक्रोशीतील गावातील नागरिकांची होणारी गैरसोय व भविष्यात पुन्हा अशी दुर्घटना घडू नये या हेतूने नवीन पुलाच्या कामाला लवकरच मुहूर्त लागेल अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वच जुन्या साकव व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होईल व तेथे आवश्यक त्या सुरक्षा विषयक उपाय योजना केल्या जातील अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com