

वडगाव मावळ, ता. १६ : मावळ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांच्या पेरणीला ब्रेक लागला असून खाचरात पाणी साचल्याने यापूर्वी पेरणी केलेले बियाणेही वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
मावळ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सुरुवातीचे तीन दिवस तो वळवाच्या स्वरूपात कोसळला तर गेल्या दोन दिवसांपासून मॉन्सून सारखी संततधार सुरू आहे. तालुक्यात मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेती मशागतीची तसेच भातासह खरीप पिकांची पेरणी रखडली होती. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने वाफसा मिळालेल्या शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे उरकली होती. सुमारे वीस टक्के क्षेत्रावर पेरणीची कामे झाली होती तर उर्वरित क्षेत्रावर पेरणीची लगबग सुरू होती. मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने पेरणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. यापूर्वी पेरणी केलेले बियाणेही वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांकडून येणाऱ्या तक्रारी व महसूल विभागाकडून सूचना प्राप्त होताच नुकसानीचे पंचनामे केले जातील व शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी दिली.
दरम्यान, निम्मा जून महिना संपल्याने व शेतात चिखल झाल्याने पेरणी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास यंदा पेरणी होईल की नाही अशी शंका निर्माण झाली असून हंगाम वाया जाईल की काय अशी भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.
सोमवारी सकाळपर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)
- वडगाव ः ३६.२
- तळेगाव दाभाडे ः३८
- लोणावळा ः १४३
- खडकाळा ः ७६
- कालेकॉलनी ः ५०
- कार्ला येथे १२६
- शिवणे ः ४१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.