ऊस बेणे, खते उधारीसह ठिबकसाठी अनुदान देणार संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊसलागवडीसंदर्भात धोरण जाहीर
वडगाव मावळ, ता. २१ ः श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत ऊस लागवड हंगाम २०२५-२६ मध्ये कार्यक्षेत्रात ऊस लागवडी संदर्भात आडसाली, पूर्वहंगामी, सुरू ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर केले आहे.
या हंगामामध्ये कमी कालावधीत जादा उत्पन्न देणारे ऊस बेणे को. ८६०३२ या बेण्यास प्राधान्य देऊन इतर जाती को. व्हीएसआय-१८१२१ व आडसाली, पूर्वहंगामाकरिता को. एम. ०२६५ उसाच्या लागवडीकरिता बेणे उधारीवर देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
जास्तीत जास्त ऊस लागवड होण्याच्या दृष्टीने लागवड हंगामात शेतकऱ्यांना कारखान्याच्या शिफारशीप्रमाणे चांगल्या प्रतीचे बेणे उधारीवर पोहोच करणे, उच्च प्रतीचे/मूलभूत प्रमाणित ऊस बेणे तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कारखान्याच्या शिफारशीनुसार खासगी व कारखाना साईटवरील नर्सरीमधून शेतकऱ्यांना ऊस रोपे वाटप तसेच ऊस उत्पादनासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे येथून उत्पादित द्रवरूप मल्टीमायक्रोन्युट्रंट, मल्टीमॅक्रोन्युटंट, जैव कीड नियंत्रण जैव संजीवक (वसंत ऊर्जा) आदी खते उधारीवर वाटप करण्यात येणार आहेत. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीची खते-ताग बियाणे, ऊस पिकांवर किटक नाशक व बुरशी नाशक ड्रोनद्वारे फवारणीसाठी सवलतीच्या दराने ड्रोनची सुविधा, फवारणीसाठी खते, बायोकंपोस्ट खत, पाचट कुजविण्यासाठी जीवाणू कल्चरचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना संशोधन केंद्रावर प्रशिक्षणासाठी ५० टक्के फी कारखान्यामार्फत भरून पाठविण्याची व्यवस्था व इतर सुविधा कारखान्यामार्फत करण्याचे धोरण कारखान्याने हाती घेतलेले आहे.
ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन करण्यासाठी एकरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी दिली. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस संशोधन केंद्र बारामती व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्यावतीने कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान योजना राबविली आहे. त्यासाठी उत्सुक शेतकऱ्यांनी आपली नावनोंदणी कारखान्याच्या शेतकी ऑफिसमध्ये करावी, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.