सामाजिक एकोपा, पर्यावरणपूरक उपक्रमांचा ‘सहवास’

सामाजिक एकोपा, पर्यावरणपूरक उपक्रमांचा ‘सहवास’

Published on

आमची सोसायटी, आमचे उपक्रम
सहवास को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी

ज्ञानेश्वर वाघमारे ः सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ, ता.२१ : डेक्कन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या वडगाव मावळातील सहवास को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीने वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम एकत्रित साजरे करून एकोपा जपला आहे. अनेक पर्यावरणपूरक उपक्रमही सोसायटीने राबविले आहेत. वीज बचतीसाठी राबविण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा त्यात समावेश आहे. स्वच्छ व सुंदर सोसायटी असा या सोसायटीचा लौकिक आहे.
या सोसायटीमध्ये बारा मजली इमारतीमध्ये ९५ सदनिका व चार स्वतंत्र रो हाऊसेस आहेत. कार्यक्रमासाठी छोटेखानी हॉल, मुलांना खेळण्यासाठी उद्यान, सुसज्ज वाहनतळ व्यवस्था, इमारतीच्या चारही बाजूला प्रशस्त रस्ता व आजुबाजूला मोकळी जागा असे उत्तम वातावरण सोसायटीला लाभले आहे. सोसायटीत २०१७ पासून सुमारे शंभर कुटुंबे व जवळपास २५० ते ३०० नागरिक सुखी व समाधानी जीवन जगत आहेत. सध्या उपाध्यक्ष सुनील घारे, सचिव विनायक यादव, खजिनदार लियाकत शेख, इतर संचालक संतोष चौगुले, रणजित वाघमारे, उषा मिंडे, प्रकाश भालेकर, संकेत कुलकर्णी हे सर्व सभासदांच्या सहकार्याने सोसायटीचे कामकाज पाहत आहेत.

धार्मिक, सामाजिक उपक्रम
सोसायटीमध्ये वर्षभरात विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव एकत्रितपणे साजरे केले जातात. त्यात प्रामुख्याने गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, होळी, रामनवमी, कोजागरी पौर्णिमा या धार्मिक सणांप्रमाणेच नववर्षाचे स्वागत, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण व विविध महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम आनंदाने व उत्साहात साजरे केले जातात. त्यात लहान थोर, महिला, वृद्ध सहभागी होतात. महिला व लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

विविध सोयी सुविधा
विंधन विहिरी घेऊन सोसायटी टँकर मुक्त करण्यात आली. आता सोसायटीत मुबलक पाणी पुरवठा होत आहे. कचऱ्याचे ओला, सुका असे योग्य वर्गीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. स्वच्छतेला प्राधान्य देऊन स्वच्छ व सुंदर सोसायटी असा लौकिक सोसायटीने प्राप्त केला आहे. पथदिवे, लिफ्ट व इतर सार्वजनिक विद्युत व्यवस्था सौर उर्जेवर सुरू आहे. २८ किलो वॅटचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे विजेच्या खर्चात मोठी बचत झाली आहे.

इआरपी ॲप सिस्टिम
सोसायटीमध्ये प्रत्येक कुटुंबाच्या व व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी २४ तास सुरक्षा सेवा व अभ्यांगत व्यवस्थापन यंत्रणा राबविण्यात येते. सभासदांना प्रति महिन्याचे व्यवस्थापन भरणे सुलभ व्हावे यासाठी इआरपी ही ॲप सिस्टिम कार्यरत करण्यात आली आहे. सोसायटीचे बहुतांशी सभासद वेळच्यावेळी देखभाल शुल्क भरून सहकार्य करतात.

निसर्गरम्य वातावरण असल्याने प्रत्येक रहिवासी त्यात हरवून जातो. ही केवळ एक सोसायटी नसून एका कुटुंबाप्रमाणे आहे. त्यामुळे सर्व सण आनंदाने साजरे करतात. त्यात गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, कोजगरी पोर्णिमा, नववर्षाचे स्वागत असे उत्सव साजरे केले जातात. लहान मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
- विनायक यादव, सचिव, सहवास हाउसिंग सोसायटी


सहवास सोसायटी म्हणजे बघता क्षणी प्रेमात पाडणारी वास्तु. सुख- शांतीचा पत्ता आणि पारदर्शकतेची प्रतिमा म्हणजे आमची सोसायटी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सर्व सभासदांच्या सहकार्याने येथे विविध सुविधा व उपक्रम राबविणे शक्य झाले आहे. या पुढील काळातही विविध उपक्रम राबविण्याचा संचालक मंडळाचा मनोदय आहे.
- लियाकत शेख, खजिनदार, सहवास हाउसिंग सोसायटी

सोसायटीमध्ये सर्व सभासद उपक्रमांसाठी सहकार्य करतात. सण उत्सवात सक्रीय सहभाग घेतात. या पुढील काळातही विविध सामाजिक उपक्रम राबवून या सोसायटीला एक आदर्श सोसायटी बनवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.
- सुधीर मुंडेकर, माजी अध्यक्ष, सहवास हाउसिंग सोसायटी

एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्ती प्रमाणे सर्व सभासदांचे आचरण असल्याने कोणालाही कोणत्या अडचणी आल्यास त्या तातडीने सोडविल्या जातात. त्यामुळे सोसायटीचा व पर्यायाने सर्व सभासदांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे.
- संतोष चौगुले, संचालक, सहवास हाउसिंग सोसायटी

निसर्गरम्य वातावरण, मोकळी हवा, स्वच्छता व टापटीपपणा ही सोसायटीची वैशिष्ट्ये असल्याने ही सोसायटी सहवास करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. रहिवासीही एकमेकांशी अतिशय प्रेमाने वागतात. एकमेकांना सहकार्य करतात.
- ॲड. दामोदर भंडारी, रहिवासी, सहवास हाउसिंग सोसायटी

कोणताही गोंगाट नाही. गजबजाट नाही. अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणात ही सोसायटी आहे. येथील सर्व रहिवासीही अतिशय को-ऑपरेटिव्ह आहेत. वर्षभरात विविध सण उत्सव साजरे करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतात.
- राजेंद्र म्हाळसकर, रहिवासी, सहवास हाउसिंग सोसायटी


राहण्यासाठी अतिशय उत्तम अशी ही सोसायटी आहे. येथील रहिवासी एकमेकांच्या अडीअडचणीला लागलीच धावून येतात. गणेशोत्सव, नवरात्र, रामनवमी असे सर्व सण गुण्या गोविंदाने साजरे करतात.
- बाळासाहेब घारे, रहिवासी, सहवास हाउसिंग सोसायटी

सुसंस्कृत आणि आनंदी जीवन जगण्यास आवश्यक असलेल्या सर्व सुविधा सोसायटीत उपलब्ध आहेत. येथील उपक्रम सदस्यांमध्ये आपसात एकता आणि सौहार्द निर्माण करतात. सोसायटीच्या व्यवस्थापनामुळे सर्व सदस्यांना एक आदर्श वातावरण अनुभवास मिळते. जीवन सुखमय आणि आरोग्यदायी राहण्यास मदत मिळते.
- प्रमोद साळवी, माजी पदाधिकारी, सहवास हाउसिंग सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com