आंदर मावळ मार्गावर जुन्या बसगाड्यांचा खडखडाट
ज्ञानेश्वर वाघमारे : सकाळ वृत्तसेवा
वडगाव मावळ, ता.२२ : कडी तुटल्याने दोरीने बांधून ठेवलेला आपत्कालीन दरवाजा, खिडकीला काच नसल्याने पावसाचे पाणी अंगावर पडू नये, म्हणून अंग चोरून बसलेले प्रवासी... बस खिळखिळी झाल्याने आवाजात वाढलेली धडधड आणि बस कधीही बंद पडेल अशी मनात असलेली धाकधूक... अशी दयनीय अवस्था असलेल्या एसटी बसमधून आंदर मावळच्या प्रवाशांना कायमच प्रवास करावा लागत आहे.
आंदर मावळ हा आदिवासी गावे असलेला मावळ तालुक्याचा दुर्गम भाग. टाटांचे ब्रिटिशकालीन ठोकळवाडी हे धरण या भागात आहे. धरणाच्या वेढ्यावर दोन्ही बाजूंनी सुमारे पंचवीस ते तीस गावे व वाड्यावस्त्या वसलेल्या आहेत. त्यातील बहुतांशी गावे ही धरणग्रस्त आहेत. या भागाच्या शेवटच्या टोकाला असलेले सावळा हे गाव. त्याचे अंतर तळेगावपासून सुमारे पन्नास किलोमीटर. एस.टी. महामंडळाची तळेगाव ते सावळा या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून एस.टी. सेवा सुरू आहे. मात्र, या मार्गावर कायम जुन्या झालेल्या एसटी बस पाठवल्या जातात. शहरी भागातून वापर करून जुन्या झालेल्या व त्या तेथून काढून टाकल्यानंतर त्यांची रवानगी आंदर मावळात केली जाते की काय, असा प्रश्न येथील प्रवाशांना कायम पडतो. सध्या या मार्गावरून धावणाऱ्या एसटी बसची अशीच अवस्था झालेली दिसून येत आहे. या भागात अरुंद रस्ता, दऱ्या खोऱ्या व रस्त्याला अनेक वेडी वाकडी वळणे असल्याने अपघाताचाही धोका संभवतो.
ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ
ग्रामीण भागातील कामगार, विद्यार्थी, रुग्ण व सरकारी कामे व बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या शहरी भागात येणारे नागरिक प्रवासासाठी एसटीचा वापर करत असतात. अनियमित सेवा असूनही नाईलाजाने त्यांना याच सेवेचा आधार घ्यावा लागतो. मात्र, अशा अतिशय जुन्या व नादुरुस्त झालेल्या गाड्या या मार्गावर पाठवून एसटी महामंडळ ग्रामीण भागातील प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याची भावना येथील ग्रामस्थांची झालेली आहे.
वडगाव-तळेगावचा माणूस लोकलने २० रुपयात पुण्याला जाऊन परत येतो. आंदर मावळातील प्रवाशांना सावळा ते कान्हे फाटा पर्यंतच्या एका बाजूच्या प्रवासासाठी ८१ रुपये, तर तळेगावपर्यंत १०१ रुपये मोजावे लागतात. भरमसाठ भाडे घेऊनही अशा दुरवस्था झालेल्या गाड्यांमधून नागरिकांना प्रवास करावा लागतो. किमान या मार्गावर दोन नवीन गाड्या द्याव्यात.
- शोभिनाथ भोईर, सामाजिक कार्यकर्ते, सावळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.