मावळात विज्ञान, संशोधन अभ्यासाचे बाळकडू

मावळात विज्ञान, संशोधन अभ्यासाचे बाळकडू

Published on

ज्ञानेश्वर वाघमारे : सकाळ वृत्तसेवा
वडगाव मावळ, ता.३ : ‘इस्रो’ व नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौऱ्याच्या निवडीसाठी शनिवारी (ता.५) पहिली चाळणी परीक्षा होत आहे. या परीक्षेला मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ५५४ विद्यार्थी बसणार आहेत, अशी माहिती सहायक गटविकास अधिकारी सेवक थोरात व गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली. परीक्षेसाठी तालुक्यात सात परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया राबविण्यात येत असून या तिन्ही टप्प्यात गुणवत्ता प्राप्त करून अंतिम तोंडी परीक्षेतून ७५ विद्यार्थी निवडले जाणार आहेत. त्यातील २५ विद्यार्थी ‘नासा’, तर ५० विद्यार्थी ‘इस्रो’ भेटीसाठी पाठवले जाणार आहेत. जिल्हा परिषद ‘नासा’ भेटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी साडेसात लाख रुपये तर ‘इस्रो’ भेटीसाठी निवड होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ७५ हजार रुपये खर्च करणार आहे. खगोल भौतिकशास्त्र केंद्राकडून (आयुका) परीक्षेचा अभ्यासक्रम ठरविण्यात आला असून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांत ही निवड प्रक्रिया होणार आहे. त्यातील पहिली पूर्व परीक्षा (चाळणी परीक्षा) शनिवारी (ता.५) सकाळी ११ ते २ या वेळेत होणार आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात व गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करून घेतली आहे.

असे आहे परीक्षेचे नियोजन
- तालुक्यातील इयत्ता सहावी आणि सातवीचे ५५४ विद्यार्थी बसणार
- दारुंब्रे, उर्से, पवनानगर, भोयरे, कान्हे, माळवाडी, कार्ला गावांमध्ये नियोजन
- प्रश्नपत्रिकेत भौतिक, रसायन, जीव व खगोलशास्त्र या चार विषयांवर १०० मार्कांसाठी ४० प्रश्न असतील.
- योग्य पर्यायाची निवड करून एका तासात प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक

सुट्टीच्या कालावधीतही सराव
तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून अगदी उन्हाही सुटीतही विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी तयारी करून घेण्यात आली आहे. तालुक्यातील वराळे येथील दिशा फाऊंडेशन व तळेगाव येथील अगत्य फाउंडेशनच्या सहकार्याने त्यांच्या सायन्स लॅबमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊन काही विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात आली, अशी माहिती गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली.

या परीक्षा आणि तयारीचा उपयोग केवळ इस्रो व नासा भेटीसाठी निवड इतकाच न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना वैज्ञानिक बनविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
- सुदाम वाळुंज, गट शिक्षणाधिकारी, मावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com