लोहगड, विसापूर परिसरात 
नो डेव्हलपमेंट झोन करा

लोहगड, विसापूर परिसरात नो डेव्हलपमेंट झोन करा

Published on

वडगाव मावळ, ता. १४ : मावळ तालुक्यातील लोहगड व विसापूर किल्ल्याच्या परिसरात पर्यटनाच्या नावाखाली विविध बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होऊन वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित राखण्यासाठी व जल, जमीन, जंगल यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने या परिसराला नो डेव्हलपमेंट झोन / पर्यावरणीय क्षेत्र (इकोलॉजिल झोन) म्हणून जाहीर करावे, अशी मागणी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित लोहगड-विसापूर विकास मंचाने केली आहे.

मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, मार्गदर्शक संदीप गाडे, सचिन निंबाळकर, सदस्य गणेश उंडे, अनिकेत आंबेकर, बसाप्पा भंडारी, अमोल गोरे, अजय मयेकर, अमोल मोरे, चेतन जोशी, संदीप भालेकर, ओंकार मेढी, सिद्धांत जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी मावळचे तहसीलदार तसेच पुरातत्त्व खात्याकडे याबाबत साकडे घातले आहे. लोहगड व विसापूर या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. ते असंख्य शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे. तसेच, निसर्गाने नटलेल्या या परिसरात विपुल प्रमाणात जैवविविधता आढळते. किल्ले लोहगडला नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकनदेखील मिळाले आहे. परंतु, पर्यटनाच्या नावाखाली विविध बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होऊन वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

लोहगड-विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाउंडचा वेढा
किल्ले लोहगड व विसापूर हे स्वराज्याचे शिलेदार तसेच तालुक्याचे वैभव आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच पराक्रमाची साक्ष असलेले हे गडकोट आहेत. ज्या किल्ल्यावर शिवरायांनी सुरतची संपत्ती ठेवली, मिर्झाराजे यांच्याबरोबर झालेल्या तहात लोहगड, विसापूर हे किल्ले मोगलांना द्यावे लागले. नेताजी पालकर, कान्होजी आंग्रे, यांचे काहीकाळ येथे वास्तव्य होते. पेशवे काळातही या किल्ल्यावर संपत्ती ठेवली जात असल्याचा उल्लेख आहे. तसेच किल्ल्याची डागडुजी पेशवे काळात केली असा उल्लेख आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडकोटांना आता तारेच्या कंपाउंडचा वेढा पडला आहे. गड पायथ्याला मोठ्या प्रमाणावर जागा खरेदी करून त्या ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली मोठ-मोठे व्यवसाय उभे केले जात आहेत. किल्ल्याच्या परिसराचा काही भाग शासनाने आरक्षित केला पाहिजे. अन्यथा गड किल्ल्याच्या परिसरातील मोठे जंगल हळूहळू नष्ट होत जाईल. जंगली पशू-पक्ष्यांना त्यांचे निवासस्थान सोडावे लागेल. बऱ्याच ठिकाणी असलेले वनीकरण उठवून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झोन करायचा प्रयत्न चालू आहे. स्थानिक लोकांच्या नावाखाली या जागा उद्योगपतींना विकल्या जात आहेत. लोहगड, विसापूरच्या परिसरात हा प्रकार सर्रास दिसून येतोय. पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार किल्ल्यापासून शंभर मीटर अंतराचे क्षेत्र हे संरक्षित निषिद्ध क्षेत्र असते. तेथून पुढील दोनशे मीटर अंतरावर कोणतेही खोदकाम व बांधकाम करण्यासाठी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. परंतु, येथे अशाप्रकारे कोणतीही परवानगी न घेता बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

‘‘लोहगड, विसापूर किल्ल्यांच्या पायथ्याला कंपाउंडचा विळखा पडला आहे. या सर्व गोष्टींकडे शासनाने लक्ष न दिल्यास शिवप्रेमी मावळे हा तारेचा मोगली विळखा काढतील. शासनाने गडकोट परिसरात जागेची मोजणी करावी, जंगलाचं ड्रोनद्वारे शूटिंग घ्यावं, म्हणजे विकासाच्या नावाखाली किती जंगल तोडले हे लक्षात येईल. शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. लोहगड व विसापूर किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित राखण्यासाठी व जल, जमीन, जंगल यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने या परिसराला नो डेव्हलपमेंट झोन / पर्यावरणीय क्षेत्र म्हणून जाहीर करावे.
- सचिन टेकवडे, संस्थापक अध्यक्ष, लोहगड विसापूर विकास मंच

‘‘लोहगड परिसरात पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ वनस्पती आणि दुर्मीळ वनस्पती मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत होत्या. दुर्दैवाने सद्यःस्थितीत पर्यटन वाढल्याने या भागातील परिसंस्थाच धोक्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष कमी होत चालल्याने अनेक पक्ष्यांची आश्रयस्थाने धोक्यात आली आहेत. जैवविविधतेने संपन्न असलेल्या सर्व बाबी कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
- डॉ. राहुल मुंगीकर, पर्यावरण तज्ज्ञ

Marathi News Esakal
www.esakal.com