रस्ता ओलांडताना पाच वर्षांत २० जणांचे मृत्यू
वडगाव मावळ, ता. १४ : वडगाव हद्दीत महामार्ग ओलांडताना गेल्या पाच वर्षांत तब्बल २० जणांचा मृत्यू झाला आहे. येथील अपघातप्रवण क्षेत्रांची (ब्लॅक स्पॉट) संख्या चार आहे. तेथे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल आवश्यक आहे. त्यामुळे अपघातांची संख्या कमी होईल, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) केली आहे.
वडगाव येथे विविध कामांसाठी तालुक्यातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. महामार्गालगत शाळा-महाविद्यालय आहे. त्यामुळे नेहमीच वर्दळ असते. पण, हा रस्ता असुरक्षित झाला आहे. याबाबत महामंडळाच्या कार्यकारी अभियंता शैलजा पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष अतिश ढोरे, देवस्थानचे सचिव अनंता कुडे, प्रभाकर वाघमारे, रवींद्र काकडे, किरण म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, चंद्रशेखर म्हाळसकर, विकी म्हाळसकर आदींनी महामार्ग रुंदीकरण, अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती देत रस्ते सुरक्षेविषयी चर्चा केली.
येथील अपघातांची दखल घेत अधिकारी आणि आयआरबी कंपनीच्या अभियंत्यांनी अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी केली होती. त्यामुळे नियोजित सहा पदरी रस्त्याच्या कामामध्ये ही कामे समाविष्ट करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल आवश्यक
वडगाव मावळ हद्दीतून जाणारा पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. (जुना) ४ व नवीन क. ४८ या रस्त्यावर वडगाव येथील अक्षय पॅलेस हॉटेल, मातोश्री हॉस्पिटल, दिग्विजय कॉलनी (शिवराज हॉटेल), माळीनगर (श्रीमंत महादजी शिंदे उद्यानाचे मागे) या चार ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल आवश्यक आहे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.