परिसर स्वच्छता ठेवा; आजार टाळा

परिसर स्वच्छता ठेवा; आजार टाळा

Published on

वडगाव मावळ, ता. १६ : मावळ तालुक्यात डेंगीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मावळ तालुका आरोग्य विभागाच्या वतीने जलजन्य आजार व कीटकजन्य आजारांबाबत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शॅरन सोनावणे यांनी दिली.
मावळ तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे बऱ्याच सखल भागात, डबक्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढण्याची शक्यता व डेंगीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मावळ तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३६ उपकेंद्रे असून, या दवाखान्यातून डेंगी रुग्णांची फारशी नोंद झालेली नाही. मात्र, तो होऊ नये यासाठी आरोग्य खात्याच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शॅरन सोनावणे यांनी दिली.
तालुका आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप, डेंगी, चिकुनगुणिया, झिका व्हायरस, हत्तीपायरोग, लहान मुलांमधील अतिसार आदी कीटकजन्य तसेच जलजन्य आजाराबाबत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. ग्रामपंचायतीच्या मदतीने गावात कोरडा दिवस पाळला जातो व आजारावर नियंत्रण केले जाते. जे रुग्ण सरकारी दवाखान्यात येतात त्यापैकी ताप असणाऱ्या रुग्णांचे रक्त तपासणीसाठी घेतले जाते व तपासणी करून त्यांना उपचार केले जातात. संशयित हिवताप रुग्णांवर आरोग्य केंद्रातून संपूर्ण उपचार केले जात आहेत. आरोग्य सेवक व आरोग्यसेविका ग्रामपंचायतीला भेटी देऊन गावातील स्वच्छतेबाबत व डास घनता वाढल्याबाबत सूचना देतात व कार्यवाही करण्यास सांगतात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
- गाव पातळीवर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका यांच्यामार्फत तसेच नगर परिषद क्षेत्रात आरोग्य विभागामार्फत कीटकजन्य व जलजन्य आजाराबाबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण
- तालुक्यातील सर्व माध्यमिक, प्राथमिक शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
- आजाराची लक्षणे, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबतच्या माहिती पत्रकांचे वाटप
- जनजागृतीच्या ऑडिओ क्लिप घंटा गाडीवरून सूचना देणे
- पाणी साठलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात येतात
- ज्या गावात डासांची घनता वाढली आहे, त्या गावात कीटकनाशक धुरफवारणी करण्याबाबत सूचना
- डेंगी संशयित रुग्णांचे रक्त नमुने घेऊन एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठविले जातात
- हिवताप दूषित रुग्णांना वयोगटाप्रमाणे व जंतूंच्या वर्गीकरणानुसार ३ ते १४ दिवसांचे मोफत उपचार
- संबंधित भागात कीटक शास्त्रीय सर्व्हेक्षण करण्यात येते.

डेंगीची लक्षणे
- अचानक येणारा तीव्र ताप
- तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी आदी
- डोळ्यांच्या हालचालीस त्रास होणे
- तोंडाची चव जाणे, मळमळ होणे
- छातीवर व हातावर लालसर पुरळ येणे
- हिरड्यातून व नाकातून रक्तस्राव होणे

नागरिकांना आवाहन
- आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा
- परिसरात कोठेही भंगार साहित्य (टाकाऊ वस्तू, टायर, फुटक्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या आदी) ठेऊ नये
- घरातील सर्व पाणीसाठे आठवड्यातून एक दिवस कोरडे करून घासून पुसून त्या भांड्यात अथवा बॅलरमध्ये परत पाणी भरावे व त्यांचे तोंड स्वच्छ कपड्याने बांधून ठेवावे
- फ्रिजच्या मागील कप्प्यामध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा काढून टाकावे
- ग्रामपंचायतींनी नियमितपणे पाणी शुद्धीकरण करावे
- नियमितपणे पाणी शुद्धीकरण केल्यास जलजन्य आजारावर
नियंत्रण ठेवता येणे शक्य
- पिण्याच्या पाण्यामध्ये नियमितपणे मेडीक्लोरचा वापर करावा

नागरिकांनी आपल्या परिसरात कोठेही पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपला परिसर स्वच्छ ठेवावा. नाले गटारी वाहती करावीत. घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. मच्छरदाणीचा वापर करावा. ताप आल्यास तो अंगावर न काढता जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन रक्ताची तपासणी करून घ्यावी.
- डॉ. शॅरन सोनावणे, मावळ तालुका आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com