वडगाव फाट्यावरील ‘यू टर्न’ जीवघेणा
वडगाव मावळ, ता. ७ : पुणे-मुंबई महामार्गावरील वडगाव प्रवेशद्वाराजवळील फाट्यावर वळण घेणाऱ्या (यू टर्न) वाहनांमुळे दोन्ही कडील वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच येथे बसथांबा नसल्याने प्रवाशांना बसची वाट पाहत रस्त्यावरच थांबावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता येथे निवारा शेड उभारण्याची आवश्यकता आहे.
गेल्या काही वर्षात तळेगाव दाभाडे, चाकण, रांजणगाव या औद्योगिक विभागातील मोठ्या कंपन्यांमुळे कंटेनर व अवजड वाहतूक करणारी वाहने, कामगार बस व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या यांची संख्या वाढली आहे. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या क्रशर व रेडी मिक्स उद्योगातील हजारो अवजड वाहने दिवसभरात अनेक वेळा वडगाव फाट्यावरून ये-जा करत असतात. तळेगाव चौकातील कोंडी कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावरून चाकण, तळेगाव एमआयडीसी व पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना तळेगाव फाट्यावर एकेरी मार्ग करण्यात आला आहे. या सर्व वाहनांना दीड किलोमीटर पुढे वडगाव प्रवेशद्वाराजवळील फाट्यावर येऊन वळण (यू टर्न) घ्यावे लागते. परंतु या फाट्यावर रस्ता अरुंद असल्याने वाहने वळण घेताना थांबून राहतात. लांबलचक कंटेनरला वळायला पुरेशी जागा नसल्याने ते संपूर्ण रस्ता व्यापतात व दोन्ही बाजूची विशेषतः: मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने थांबून राहतात व वाहतूक कोंडी होते. त्यातच येथे रिक्षा, स्कूल बस, पीएमपीएल बस, विविध कंपन्यांच्या बसचे प्रवासी त्यांच्या वाहनांची प्रतीक्षा करत थांबलेले असतात. त्यांना येथील वळण घेणाऱ्या तसेच मुंबईहून पुण्याकडे वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका संभवतो. महामार्ग ओलांडणाऱ्या वाहनांनी येथे अनेकदा अपघात झालेले आहेत. कोंडीच्या वेळी वडगाव शहरात जाण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडून वाहने घेऊन जावे लागते. मुंबई बाजूकडून येणारी वाहने उतार असल्याने भरधाव येतात. त्यामुळे रस्त्यालगत थांबलेल्या प्रवाशांना मोठा धोका संभवतो. प्रवाशांची व ग्रामस्थांची सुरक्षितता लक्षात घेऊन येथे कायमस्वरूपी सुरक्षाविषयक उपाययोजनांची गरज आहे. त्या मार्गी लागेपर्यंत येथे तात्पुरत्या उपाययोजना त्वरित करण्याची गरज आहे.
येथे यू टर्न घेणाऱ्या वाहनांमुळे दररोज सकाळ-संध्याकाळच्या वेळी वाहतुकीची कोंडी होते. त्या वेळी बसस्थानकावर उभे असलेले प्रवासी आणि विद्यार्थी यांना अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे येथे निवारा शेडसह इतर सुरक्षा विषयक उपाययोजना करण्याची गरज आहे.
- आशा नवघणे, स्थानिक प्रवासी
येथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता लक्षात घेऊन भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. तात्पुरत्या स्वरूपात येथे वाहतूक नियंत्रक, वेग मर्यादेसाठी ब्लिंकर दिवे, साईन बोर्ड, सूचना फलक आदी उपाययोजना कराव्यात.
- प्राप्ती नरसाळे, प्रांजल देशमुख, प्रवासी.
येथे यू टर्न च्या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने मोठ्या वाहनांना वळण घेण्यास उशीर लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. म्हणून चौकातील रस्त्याचे रुंदीकरण व चौकाचा विस्तार करणे गरजेचे आहे. नादुरुस्त रस्त्याची कायमस्वरूपी देखभाल आवश्यक आहे.
- दिनेश नवघणे, प्रवासी
वडगाव फाट्यावरील नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती, वळणावरील रस्त्याचे रुंदीकरण, वेग नियंत्रणासाठी ब्लिंकर दिवे, वाहनचालकांसाठी साईन बोर्ड व सूचना फलक आदी उपाययोजना करण्यासाठीचे पत्र महामार्गाची देखभाल करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
- कुमार कदम, पोलिस निरीक्षक, वडगाव पोलिस स्टेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.