आरक्षण निश्चितीमुळे वडगावात इच्छुकांची धावपळ
वडगाव मावळ, ता. ९ : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागांचे आरक्षण निश्चित होताच निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले अनेक इच्छुक उघडपणे मैदानात उतरले असून, त्यांनी फ्लेक्स, बॅनर व सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला नागरिकांपुढे आणून एक प्रकारे प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.
वडगाव नगरपंचायतीच्या १७ प्रभागांचे आरक्षण बुधवारी निश्चित झाले. सतरा पैकी नऊ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असून, नगराध्यक्ष पदही यापूर्वीच महिलांसाठी आरक्षित झाले आहे. नगरसेवकांच्या पाच जागा सर्वसाधारण असून, चार जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. इतर मागास वर्गातील पाच जागांपैकी तीन जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला व अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गाच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे. प्रभागाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर लागलीच मनासारखे आरक्षण निघालेल्या इच्छुकांनी फ्लेक्स, बॅनर व सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला प्रेझेंट करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता त्यांनी थेट मैदानात उडी घेतली आहे. एक प्रकारे स्वतःची उमेदवारी जाहीर करून प्रचारालाच सुरुवात केली आहे. काही ठिकाणी दिवाळी शुभेच्छांचे मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स, बॅनर्स लावले गेले असून, सोशल मीडियावर उमेदवारांचे ‘ब्रँडिंग’ मोहीम सुरू झाली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप गटांमधून विविध घोषवाक्ये, भेटीगाठींचे फोटो, आणि जनसंपर्क मोहिमा झळकू लागल्या आहेत.
संधी हुकलेल्यांकडून पर्यायांचा शोध
आरक्षण निश्चितीनंतर काही प्रभागातील समीकरणे बदलली आहेत. सर्वसाधारण वर्गासाठी अवघ्या पाच जागा असल्याने इच्छुकांची सर्वाधिक संख्या असलेल्या या वर्गातील अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. मात्र, त्यातील काही इच्छुकांनी अगोदरच पर्याय शोधून ठेवला असल्याचे उघड झाले आहे. महिलांचे आरक्षण आलेल्या प्रभागात संधी हुकलेल्या इच्छुक कार्यकर्त्यांनी आपल्या पत्नीची उमेदवारीसमोर आणली आहे. काही जण इतर मागास प्रवर्गातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत तर काही जणांनी आता पर्याय शोधण्यास सुरुवात केली असून, दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवता येईल का, याची चाचपणी करत आहेत. काही इच्छुक द्विधा मनःस्थितीत असून, प्रतिस्पर्धी इच्छुकांची ताकद अजमावत आहेत. राजकीय पक्षांनीही प्रबळ उमेदवारांची चाचपणी व शोध सुरू केला आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने व येथे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सक्रिय असल्याने येथील कोणतीही निवडणूक चुरशीने लढली जाते. आरक्षण निश्चितीमुळे येथील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, निवडणुकीच्या घोषणेनंतर हालचालींना आणखी वेग येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.