बेवारस इंधन टँकरचा गुरुवारी वडगावात लिलाव
वडगाव मावळ, ता.१४ : वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या परिसरात पडून असलेल्या चार बेवारस इंधन वाहतुकीच्या टँकर्सचा कायदेशीर लिलाव गुरुवारी (ता.१६) सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिली.
वडगाव पोलिस ठाणे परिसरात चार इंधन वाहतुकीचे टँकर पडून असून त्यांचे वाहन क्रमांक व चॅसिस क्रमांक दिसून येत नाहीत. या बेवारस वाहनांचा कायदेशीर लिलाव तहसीलदार व प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या लिलाव प्रक्रियेदरम्यान भंगार व्यावसायिक यांनी वडगाव मावळ पोलिस ठाणे येथे हजर राहावे. येताना आपल्या सोबत आधारकार्ड, शॉपॲक्ट लायसेन्स, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सोबत आणावीत. लिलावामध्ये विकत घेतलेली बेवारस वाहने भंगार व्यावसायिक यांना इतरत्र विकता येणार नाहीत किंवा वापरता येणार नाहीत. भंगार व्यावसायिकाने ही वाहने भंगारात (स्कॅप) काढणे बंधनकारक राहील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.