वडगावमध्ये पेन्शनरांच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय
वडगाव मावळ, ता. १७ : पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. २०) ईपीएफओ कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय मावळ तालुका ‘ईपीएस-९५’ निवृत्त कर्मचारी समन्वय समितीने घेतला आहे.
मावळ तालुका ‘ईपीएस-९५’ निवृत्त कर्मचारी समन्वय समितीची बैठक येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये गुरुवारी झाली. समितीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, उपाध्यक्ष शंकरराव शेवकर, तालुकाध्यक्ष दशरथ ढोरे, सचिव विजयकुमार राऊत, पांडुरंग तिखे, राजाराम नाटक, गणेश भानुसघरे, दत्तात्रय दाभाडे, नितीन भांबळ, शांताराम कुडे, मनोहर बागेवाडी, नंदकुमार बवरे, सिताराम वाटाणे, दत्तात्रय घोलप आदींसह मोठ्या संख्येने पेन्शनर उपस्थित होते.
‘ईपीएस-९५’ राष्ट्रीय संघर्ष समिती ही वृद्ध पेन्शनधारकांची संघटना २७ राज्यांमध्ये कार्यरत आहे. पेन्शनधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी ही समिती गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडे विविध प्रकारची आंदोलने, चर्चा आदी विविध मार्गांनी पाठपुरावा करत आहे. पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री व श्रममंत्री यांच्याशी अनेकवेळा चर्चा होऊनही सकारात्मक निर्णय होत नाही. ६० ते ८५ वयोगटातील सर्व वयोवृद्ध पेन्शनर पेन्शन वाढीची वाट बघत आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध कार्यालयांवर उपोषण, आंदोलन करण्याचा निर्णय राष्ट्रीय संघटनेने घेतला आहे. त्या अनुषंगाने २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ईपीएफओ कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय संघर्ष समिती अध्यक्ष कमांडर अशोक राऊत व महासचिव वीरेंद्रसिंह राजावत यांच्या नेतृत्वात देशभर हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती विजयकुमार राऊत यांनी दिली.

