अजित पवार यांचे मावळशी नाते
अजितदादांच्या आठवणींनी मावळ सुन्न
तालुक्यातील विविध बाजारपेठा बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली; आठवणींना उजाळा
वडगाव मावळ, ता. २८ : गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून मावळ तालुक्याशी संपर्क असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे मावळ तालुक्यात शोककळा पसरली. त्यांचा अकाली मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला. तालुक्यातील विविध बाजारपेठेतील व्यापारी व व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
अजित पवार यांचा मावळ तालुक्याशी पूर्वीची एकत्रित काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून संपर्क राहिला आहे. अनेक निवडणुकांच्या प्रचारसभा तसेच विकास कामांच्या भूमिपूजन-उदघाटन कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली आहे. अनेक जुन्या जाणत्या नेत्यांचा तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाही त्यांचा थेट संपर्क होता. अलीकडच्या काळात पक्षाचा आमदार झाल्यानंतर त्यांचा संपर्क अधिकच वाढला होता. त्यामुळे त्यांची तालुक्याशी नाळ जुळली होती. पवना जलवाहिनी प्रकरणात त्यांच्यावर दोषारोप झाले होते. मात्र, नंतरच्या काळात ते मळभ दूर करण्यात पक्षाला यश आले. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात पक्षाला यश मिळत असताना पंचवीस वर्षे मावळात यश मिळत नसल्याबद्दल त्यांनी अनेकदा खंत व्यक्त केली होती. ‘मला आमदार ,द्या मी तालुक्याला हवा तेवढा निधी देतो,’ अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यांचे आमदारकीचे स्वप्न २०१९ मध्ये पूर्ण झाले. आमदार सुनील शेळके यांच्या रूपाने प्रथमच पक्षाला मावळात आमदारकी मिळाली. त्यांनी जलसंपदा मंत्री असताना आंदर मावळातील कोंडिवडे पूल, टाटा धरणातून शेतीला पाणी,
धरणग्रस्तांचे काही प्रश्न मार्गी लावले होते. गेल्या सहा वर्षात त्यांनी तालुक्याला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. शहरी भागातील रस्त्यांची कामे, भूमिगत गटारे, कान्हे व लोणावळा येथील उपजिल्हा
रुग्णालय, वडगाव येथील प्रशासकीय इमारत, पोलिस स्टेशन, नद्यांवरील पूल, आंदर मावळातील रस्त्याचे रुंदीकरण आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला. लोणावळा येथील ग्लास स्काय वॉक हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याचेही त्यांचे स्वप्न होते. भंडारा डोंगर पायथ्याला एक हजार कोटी रुपये खर्चून संत कॉरिडॉर उभारण्याचा संकल्पही नुकताच त्यांनी व्यक्त केला होता. ४ जानेवारी रोजी त्यांचा मावळात शेवटचा दौरा ठरला. वडगाव, लोणावळा व तळेगाव येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला होता. कामशेत येथे विठ्ठल परिवार आयोजित कीर्तन सोहळ्याला हजेरी लावून त्यांनी वारकऱ्यांसोबत पंगतीमध्ये भोजनाचा आस्वादही घेतला होता. मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार होता. त्यामुळे दादांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक वर्षातील त्यांच्या बरोबरीच्या आठवणींना उजाळा देताना कार्यकर्ते अतिशय भावुक झाले होते.
अजितदादा म्हणजे राजकारणातील चैतन्य. त्यांच्या निधनामुळे हे चैतन्य हरवले आहे. महाराष्ट्राचे राजकारण लाइव्ह ठेवण्याचे काम त्यांनी केले. स्पष्टवक्तेपणा व परखडपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्टे होती. त्यांच्याकडे काम घेऊन गेल्यावर ते होणारच याची खात्री असे. त्यांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान झाले आहे.
- मदन बाफना, माजी राज्यमंत्री
ही अतिशय दुःखद व वेदनादायक घटना आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावर पकड असणारा, विरोधकांशीही सुसंवाद ठेवणारा व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय देणारा नेता हरपला आहे. महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना सर्वत्र दिसून येत आहे.
- बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री
दादांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून बँकेत दादांबरोबर अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली व त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा झाला. मंत्री,
उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे कामे घेऊन गेल्यानंतर जे होणे शक्य असेल व कायद्याच्या कक्षेत बसणारे असेल तर ते तत्काळ अधिकाऱ्यांना सांगून मार्गी लावत. त्याच कामासाठी पुन्हा त्यांच्याकडे जाण्याची वेळ गेल्या ३५ वर्षात कधीही आली नाही. सत्तेत असो अथवा नसो त्याच लयीने व तडफेने काम करणारा हा महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे.
- माऊली दाभाडे, ज्येष्ठ नेते
अजितदादा पवार हे एक कार्यक्षम, विकासात्मक दृष्टीचे नेतृत्व होते. त्यांनी मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना अतिशय प्रेम दिले. मावळातील सर्व प्रकारच्या विकासकामांना त्यांनी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला. अनेकांना जिल्हा बँक, कात्रज दूध संघ, शासकीय समित्या, विधान सभा व विधान परिषदवरही संधी उपलब्ध करून दिली. मला गेली अनेक वर्षे दादांच्या जवळून काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे. दादांच्या जाण्याने अतिशय दुःख झाले आहे. मावळवासीयांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
- बबनराव भेगडे, माजी अध्यक्ष, जिल्हा बँक
अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्रातील माझ्यासारख्या असंख्य सामान्य कार्यकर्त्यांवर फार मोठा आघात झाला आहे. प्रचंड मेहनत घेणारा नेता. चांगल्या कार्यकर्त्याची काळजी घेणारा नेता. दिलदार व्यक्तिमत्त्व हरपले आहे. जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून २००४ पासून दादांचा सहवास लाभला. त्यांच्या अनुभवाचा लाभ झाला. त्यांच्यामुळेच मेहनत घेण्याची क्षमता वाढत राहिली. तालुक्यातील जनतेचा कोणताही प्रश्न असू द्या. दादांना एकदा व्यवस्थित समजला की मार्गी लावण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करायचे. अजितदादा इतका दिलदार नेता आज तरी कोणी नाही.
- बाळासाहेब नेवाळे, माजी अध्यक्ष, जिल्हा दूध संघ
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करण्याची संधी मला दादांमुळे मिळाली. त्या काळात त्यांची काम करण्याची पद्धत जवळून पाहता आली. चुकीच्या गोष्टींना थारा न देणारा आणि योग्य गोष्टींसाठी ठाम उभा राहणारा नेता म्हणजे दादा. सामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हा त्यांचा स्वभाव होता. महिलांप्रती असलेला त्यांचा आदर प्रत्येक कृतीतून दिसून यायचा. कार्यकर्त्यांशी मोकळेपणाने, कधी रोखठोक बोलणारे दादा, पण महिलांशी बोलताना कधीही शब्दांची मर्यादा ओलांडत नव्हते. ‘तू इंजिनिअर आहेस, तुझ्या ज्ञानाचा उपयोग बँकेसाठी झाला पाहिजे,’ असे सांगत त्यांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली. दादांसारखा नेता पुन्हा होणे कठीण आहे.
- अर्चना घारे, माजी उपाध्यक्षा, जिल्हा बँक
जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अजित दादांची नितांत श्रद्धा होती. भंडारा डोंगरावर निर्माण होत असलेल्या जगदगुरू श्री संत तुकोबारायांच्या मंदिर कार्यासाठी व भंडारा डोंगराच्या पायथ्याला शंभर एकर परिसरात भव्य कॉरिडॉर निर्माण कार्यासाठी एक हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याचा सेवाभाव त्यांनी व्यक्त केला होता. वारकरी संप्रदाय व संत सेवेसाठी अतिशय मनापासून गतिशील कार्य करणारे, अत्यंत सुस्पष्ट वक्ते, सर्वांचे लाडके नेतृत्व आज आकस्मिक हरपले आहे. या अत्यंत दु:खद घटनेने सर्व वारकरी संप्रदायातील भाविक भक्त यांना दु:ख झाले आहे.
- बाळासाहेब काशीद, अध्यक्ष, भंडारा डोंगर दशमी समिती
अजितदादा हे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांवर मनापासून प्रेम करायचे. त्यांच्याशी उत्तम सुसंवाद ठेवायचे. त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ते रागावले तरी कार्यकर्ते पुन्हा त्यांच्याकडे जायचे. आंद्रा धरणग्रस्त व नवलाख उंब्रे परिसरातील एमआयडीसी संबंधित अनेक प्रश्न त्यांच्याकडे घेऊन जाण्याचा योग आला. प्रत्येक वेळी त्यांनी यथाशक्ती मदत केली.
- दत्तात्रेय पडवळ, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.
अजितदादा म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा नेता होता. निरपेक्ष भावनेने काम करणारे, प्रशासनावर वचक असणारे व निर्णयक्षम नेतृत्व आज हरपले आहे.
- भास्करराव म्हाळसकर, प्रभारी मावळ भाजप
जलसंपदा मंत्री असताना अजित दादांनी आंदर मावळच्या ग्रामीण भागातील अनेक प्रश्न मार्गी लावले होते. विशेषतः वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा कोंडिवडे पुलाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. टाटांच्या ठोकळवाडी धरणातून शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाणी योजनांसाठी पाणी उचलण्याची परवानगी त्यांनी मिळवून दिली. धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले.
- नारायण ठाकर, संघटन मंत्री, मावळ राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

