

वडगाव मावळ, ता.६ : ‘‘पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येत्या दीड महिन्यात मार्गी लावा. तसेच पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करा. तसे न केल्यास २ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांचा लाँग मार्च काढून जलसमाधी आंदोलन करू,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शेट्टी यांनी गुरुवारी पवना धरणग्रस्तांची बैठक घेतली व त्यानंतर वडगाव येथील मावळ पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करत भूमिका मांडली. या वेळी धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके, जमीन हक्क परिषदेचे संस्थापक माउली सोनवणे, रयत प्रहार संघटनेचे अध्यक्ष भरत मोरे, बाळासाहेब मोहोळ, भारत ठाकुर, रविकांत रसाळ, अमित कुंभार, मारुती दळवी, संतोष दळवी, सुभाष धामणकर, दत्तात्रय ठाकर, दिनकर शेटे आदींसह मोठ्या संख्येने धरणग्रस्त उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, ‘‘गेल्या साठ वर्षांपासून पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडले आहे. १९७३ च्या पुनर्वसन कायद्यानुसार ८६३ खातेदारांचे पुनर्वसन अद्याप प्रलंबित आहे. या कालावधीत अनेक सरकारे, धरणग्रस्तांच्या पिढ्या बदलल्या. मात्र, परिस्थिती कायम आहे. धरणाच्या पाण्याचा लाभ पिंपरी चिंचवडसह अनेक शहरे घेतात. मात्र, ज्या भूमिपुत्रांची घरे दारे धरणाखाली बुडाली ते धरणग्रस्त पुनर्वसनाची वाट पाहात आहेत.’’
‘‘सन २०११ मध्ये बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात आंदोलन झाले. त्यात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळा भेगडे त्यावेळी आमदार होते. सरकार बदलले, तर सर्व बदलू अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र, आता ते गप्प आहेत,’’ असा आरोप शेट्टी यांनी केला. अमित कुंभार यांनी प्रास्ताविक केले. भरत मोरे यांनी आभार मानले.
शेट्टी म्हणाले...
- धरणग्रस्तांनी गेली साठ वर्षे पुनर्वसनासाठी वाट पाहिली. आता प्रश्न सुटला नाही तर कोणालाच पाणी मिळणार नाही
- २०११ ची पुनरावृत्ती होऊ नये, असे शासनाला वाटत असेल तर धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन तातडीने मार्गी लावावे. बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.