उद्योगनगरीत अवतरली अवघी मराठी रंगभूमी

उद्योगनगरीत अवतरली अवघी मराठी रंगभूमी

उद्योगनगरीत अवतरली अवघी मराठी रंगभूमी

नाट्यदिंडीत लोकसंस्कृतीचा जागर आणि कलावंतांचा जल्लोष

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
चिंचवड, ता. ६ : अवघी मराठी रंगभूमी जणू शनिवारी (ता. ६) उद्योगनगरीत अवतरली होती. महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरापासून शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नाट्यदिंडीला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचा जागर करत तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील लोककला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या लोककलावंतांच्या उत्स्फूर्त सहभागाने शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनास दिमाखात प्रारंभ झाला.
मराठी रंगभूमीवरील कलावंतांची मांदियाळी उद्योगनगरीत जमली होती. मोरया गोसावी मंदिर, गांधी पेठ, तानाजीनगर मार्गे ही दिंडी सूर्यमाला सभामंडपात आली. ढोल, ताशा, लेझीम, संबळ, हलगी, टाळ-मृदंग, सनई आदी पारंपरिक वाद्यांच्या तालावर दिंडीत सहभागी कलाकार, विद्यार्थी, नागरिक थिरकले.
वासुदेव, पिंगळा, गोंधळी, वाघ्या-मुरळी, कोकणी नृत्यकला, तारफा, दशावतार, भिल्ल लोककला, गजीनृत्य, लमाण तांडा, पोतराज इत्यादी लोककलांचे दर्शन घडवीत निघालेल्या दिंडीने उद्योगनगरीची सकाळ प्रसन्न केली. दिंडी मार्गावरील रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या नागरिकांनी नाट्यदिंडीवर फुलांची उधळण केली. नागरिकांना मराठी तारकांचे एकाच वेळी दर्शन घडले. त्यामुळे आवडीच्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. एका क्लिकसाठी चढाओढ सुरू होती. नाटक किंवा सिनेमात दिसणारे कलाकार नाट्यदिंडीत आपल्यासोबत चालत असल्याचे अप्रूप अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हा दिंडी सोहळा आपल्या कॅमेऱ्यातून टिपण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शेकडो हात उंचावले होते.

मान्यवरांसह कलावंत नाट्यदिंडीत
चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरापासून सुरुवात झालेल्या दिंडीच्या प्रारंभी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल उपस्थित होते. अभिनेता वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक, केदार शिंदे, मोहन आगाशे, विजय केंकरे, दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री प्रिया बेर्डे, सविता मालपेकर, वर्षा उसगावकर, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, निर्मिती सावंत, कविता लाड, अमृता सुभाष, स्पृहा जोशी, कांचन अधिकारी, शुभांगी गोखले, सुकन्या मोने, सुशांत शेलार, भारत जाधव, चेतन दळवी, जयवंत वाडकर, संजय मोने, उमेश कामत, संजय खापरे यांच्यासह असंख्य कलावंत सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांनी साकारल्या वेशभूषा
नाट्यदिंडीत शहरातील अनेक शाळांचे हजारो विद्यार्थी व त्यांचे शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषा केली होती. काही एनसीसीच्या व शालेय गणवेशात सहभागी झाले होते. जयवंत भोईर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चापेकर बंधूंची व शहीद भगतसिंग यांची वेशभूषा करीत टांग्यातून हजेरी लावली. तर गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महासाधू मोरया गोसावी यांची वेशभूषा केली होती. काहींनी दांडपट्टा, तलवारबाजी, भाला चालविणे इत्यादींचे प्रात्यक्षिके सादर केली. नाट्यदिंडीत संत गाडगे बाबांच्या वेशभूषेत सहभागी झालेले सोलापूरचे एकपात्री कलाकार फुलचंद नागटिळक लक्ष वेधत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com