

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
हिंजवडी, ता. १० : आयटी नगरी माण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोईरवाडी (ता. मुळशी) या शाळेला जोडून स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर माध्यमिक व उच्च माध्यमिकचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे स्थानिक आणि रोजगारानिमित्त स्थलांतरित झालेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना शिक्षणाचे द्वार खुले झाले आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे कार्यासन अधिकारी प्रमोद कदम यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेस व वर्गखोल्यांना परवानगी मिळवण्याबाबत माणच्या सरपंच अर्चना आढाव, गावचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार भोईर, ग्राम विकास अधिकारी मदन शेलार यांनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दिला होता. तसेच मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्याकडे त्याबाबत विनंती केली होती. त्यास अनुसरून मांडेकर यांनी शासनाच्या शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर गावातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.
सद्यस्थितीत प्राथमिक शाळेत आठवीपर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. मात्र पुढील शिक्षणासाठी त्यांना लांब पल्ल्यावरील घोटावडे किंवा हिंजवडी गाठावी लागत असे. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ अन्वये स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन स्तरावरुन परवानगी देण्यात आली आहे. प्राथमिक शाळेला जोडून माध्यमिक ते उच्च माध्यमिक म्हणजे नववी ते बारावीपर्यंतच्या मराठी माध्यमास मान्यता प्राप्त झाली आहे.
माणच्या सरपंच अर्चना आढाव तसेच आमचे सहकारी नंदकुमार भोईर यांनी माण गावातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती आणि पालकांच्या अडचणी आदी बाबी समजून सांगितल्या. विद्यार्थी व पालकांची हेळसांड न होता भावी पिढी उज्वल घडवण्यासाठी नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना परवानगी मिळावी म्हणून कसोशीने प्रयत्न केले. त्यास यश मिळाले.
- शंकर मांडेकर, आमदार, भोर-वेल्हा-मुळशी
माण व भोईरवाडी शाळेत स्थानिकांबरोबरच कंपन्यांत काम करणाऱ्या गरीब व गरजू कर्मचाऱ्यांची मुले प्रामुख्याने शिक्षण घेत आहेत. परंतु शाळा आठवीपर्यंतच असल्याने पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जाताना विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठी फरपट होत असे. अनेक जण शिक्षण अर्धवट सोडत. हा प्रकार थांबावा म्हणून आमदार शंकर मांडेकर यांना विनंती केली होती. गावाचे हित पाहता माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांना तत्काळ मंजुरी मिळण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
- अर्चना आढाव, सरपंच, माण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.