काळाखडक येथील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर

काळाखडक येथील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर
Published on

वाकड, ता. ११ : येथील काळाखडक झोपडपट्टीचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांसाठी महापालिका प्रशासनाच्या परवानगीने किवळे येथे तात्पुरती निवारा सुविधा सुरू करण्यात आली आहे. येथील रहिवासी उत्स्फूर्तपणे तेथे स्थलांतरित होत आहेत.

किवळेतील ११ हजार ६६४ चौरस मीटर इतक्या जागेवर हा कॅम्प उभारण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. येथे वीज, मुबलक पाणी, ड्रेनेज अत्यावश्यक सेवांसह सुविधांचा अंतर्भाव या कॅम्पमध्ये आहे. मात्र, ‘‘काही जण स्वार्थापोटी परिसरातील सोसायटीधारकांत हा कॅम्प बेकायदा असल्याचा समज पसरवून वेगळे वळण देत आहेत. आम्हा नागरिकांना येथे वास्तव्य करण्यास विरोध करून संघर्ष उभा केला जात आहे,’’ असा आरोप रहिवाशांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

तिरस्काराची भाषा का?
‘‘तुमची धुणी-भांडी करतो, सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालकही आम्हीच, तुमच्या लहान मुलांचे पालन-पोषण-सांभाळह करतो, स्वयंपाक करून देतो, साफसफाई-बागकाम अन सुरक्षारक्षक बनून तुमचे रक्षणही करतो. मग, तुमच्याजवळ राहण्याचा अधिकार आम्हाला नाही का? आमच्या गरिबीचा इतका तिरस्कार का?’’ असा सवाल विरोध करणाऱ्या सोसायटीधारकांना
काळाखडक येथील नागरिकांनी केला आहे. ‘‘आमचा मुक्काम तात्पुरता आहे. पुनर्वसन होताच आम्ही हक्काच्या घरात परत जाऊ,’’ असा भावनिक वचननामा या रहिवाशांनी जाहीर केला आहे.

विरोध असेल, तर झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन कसे होणार? प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तात्पुरते स्थलांतर गरजेचे असते. सामाजिक सलोखा आणि संविधानाची भाषा करताना समता आणि बंधुता याचाच विसर काहींना पडला आहे.
- बाळासाहेब पाटोळे, रहिवासी काळाखडक

आमच्या काम-व्यवसायाची गैरसोय होत असताना मनावर दगड ठेवून तात्पुरत्या कॅम्पमध्ये राहण्यासाठी आम्ही आलो आहोत. किवळेतील कार्यकर्ते, सोसायटीधारक व इतर कार्यकर्ते आम्हाला हीन वागणूक देत असतील, तर घटनेने दिलेल्या जगण्याच्या अधिकाराची अवहेलनाच आहे.
- सत्यभामा लष्करे, रहिवासी, काळाखडक

बालाजी कॉलेजशेजारी २० वर्षांपासून झोपडपट्टी आहे. मात्र, आजवर महिला छेडछाडीची एकही तक्रार नाही. पुनर्वसन इमारत पूर्ण होईपर्यंत शिबिरातजाण्याची मुभा शासन नियमावलीत आहे. प्रकल्प महाराष्ट्र शासन व पिंपरी चिंचवड महापालिकेचा आहे. शासन नियमानुसारच शिबिराला परवानगी दिली आहे.
- अलका धनवडे, रहिवासी, काळाखडक

येथील नेत्यांनी आपल्या मतांसाठी काळाखडक परिसराची बदनामी चालवली आहे. आम्ही येथे येण्याने चोऱ्या, गुन्हेगारी आणि छेडछाडीच्या घटनात वाढ होणार असल्याचे अपमानजनक वक्तव्य काहींनी केले. ते निंदनीय आहे.
- किशोर खंडागळे, सदस्य, काळाखडक रहिवासी संघ

मी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसताना चुकीची व खोटी माहिती प्रसारित केली जात आहे. हे अतिशय चुकीचे आहे. त्याबाबत आमचे जनसंपर्क अधिकारी कायदेशीर उत्तर देतीलच. तक्रार येताच कारवाईसाठी आमचे पथक गेले होते. मात्र, संक्रमण शिबिरास परवानगी असल्याचे मला वरिष्ठांनी सांगितले होते. रीतसर माहिती बांधकाम परवाना विभागाकडून मिळेल.
- अमित पंडित, सहाय्यक आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com