

वाकड, ता. ३१ : ‘‘देशाच्या अर्थव्यवस्थेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे भरीव योगदान आहे. जपानला मागे टाकत देश चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आता अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला मागे टाकून जगातील क्रमांक एकची आर्थिक महासत्ता बनायचे असल्यास ‘एआय’ तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय गत्यंतर नाही’’, असे प्रतिपादन एएसएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललित कानोरे यांनी शनिवारी (ता. ३१) केले.
सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोनिमित्त ‘एआय’मुळे शिक्षणाचा नवा दृष्टिकोन आणि करिअरच्या नवनवीन संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. कानोरे म्हणाले, ‘‘संगणकाप्रमाणेच ‘एआय’चा धोका असल्याची चर्चा काही प्रमाणात आहे. मात्र, ‘एआय’चा वापर करून भविष्यात आपण पुढे कसे जाऊ ? यावर विचार आणि कृती करायला हवी. ‘एआय-चॅट जिपीटी’ हे आपला अविष्कार नाही; पण ते अंमलात आणण्याची प्रगल्भ क्षमता आपल्यात आहे. त्यासाठीचे आर्थिक पाठबळ देण्याची देशाची तयारी आहे. सरकारने अर्थव्यवस्थेत तशी तजवीज केली आहे. इंडिया एआय मिशनअंतर्गत २०२७ पर्यंत स्वतःचे एआय तंत्रज्ञान आणण्याचे देशाचे स्वप्न आहे. शिक्षण, आरोग्य सेवा, कृषी, मनोरंजन व इतर सर्वच क्षेत्रांत या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध आहेत. एआय इंजिनिअर, टूल्स मॉडेल डेव्हलपर आपण बनू शकतो. तसेच सॉफ्टवेअर तयार करण्यापेक्षा सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांची अधिक गरज मार्केटमध्ये आहे.’’
एआयची प्रात्यक्षिके...
एएसएमचे प्रा. सुजित बिश्वास यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानाची करामत, जादूई चमत्कार प्रात्यक्षिकांसह दाखविली. कोणत्या कामासाठी, कुठल्या वेळी कोणते टूल वापरावे ? याची अनेक उदाहरणे देत त्यांनी ‘एआय’ची परिणामकारकता स्पष्ट केली. ग्रोक, जेमिनी, डीपसिक, ब्लीन्क, मेटा, कॅनवाय, अशा अनेक टुलचे विशेष वैशिष्ट्ये तसेच एकाचवेळी एकाच ठिकाणी आपल्या गरजेनुसार आपोआप वापरता येणारे जेन स्पार्क या टूलचीही माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.