‘आयटी पार्क’च्या महापालिकेत समावेशाला बळ

‘आयटी पार्क’च्या महापालिकेत समावेशाला बळ

Published on

बेलाजी पात्रे : सकाळ वृत्तसेवा
हिंजवडी, ता. २६ : देशातील तिसऱ्या क्रमांकाचे ‘आयटी हब’ असलेल्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कची पहिल्याच पावसात लाजीरवाणी अवस्था झाली. आवाक्याबाहेर गेलेली परिस्थिती सुधरवण्यासाठी आयटी पार्कची गावे महापालिकेत समाविष्ट होणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी मोहिमेला स्थानिकांकडून बळ मिळत असले, तरी काही संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.
स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून आयटी कर्मचाऱ्यांनी व स्थानिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश करण्याची जोरदार मागणी सुरू केली आहे. अवघ्या तीन दिवसांत २१ हजारांहून अधिक नागरिकांनी या ऑनलाइन मोहिमेला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावरही मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ‘महापालिकेत समावेश’ हाच एकमेव पर्याय असल्याचे मत आयटीयन्स आणि रहिवाशांकडून व्यक्त केले जात आहे. राज्य शासनानेदेखील याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळा अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयटी क्षेत्रातील रस्ते, वाहतूक व पायाभूत सुविधांवरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. पहिल्याच पावसात आयटीची जलकोंडी झाल्याने कर्मचाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्या पार्श्वभूमीवर हिंजवडी-माण ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत राज्यकर्त्यांनी सुतोवाच केले होते. त्या निर्णयास काही स्थानिक पुढाऱ्यांनी विरोध केला असून स्वतंत्र नगर परिषद अथवा नगरपालिकेची मागणी केली आहे. तर काही ग्रामस्थांनी या भागाचा सुनियोजित विकासासाठी महापालिका आणि सनदी अधिकारीच आयुक्त आवश्यक असल्याची आग्रही मागणी केली आहे.

कंपन्यांचे प्राधान्य बंगळूर किंवा हैद्राबादला
हिंजवडीत असलेल्या जागतिक दर्जाच्या आयटी कंपन्यांचे कार्यालये बंगळूर, हैद्राबाद येथेदेखील आहेत. मात्र, त्यांच्या व्यवस्थापनाच्या बैठकीत हिंजवडीला टाळून उच्चस्तरीय समिती बंगळूर किंवा हैद्राबादला प्राधान्य देते. असे एका उच्चपदस्थ आयटी कंपनी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तर, नामांकित कंपन्यांनी इतरत्र आपली विकास केंद्रे सुरू करून स्थलांतराचा पर्याय निवडल्याचेही ते म्हणाले.

गावपातळीवरील नेत्यांचा विरोध
हिंजवडी, मारुंजी, माण, जांबे, गहुंजे, सांगवडे व नेरे ही सात गावे २०१५ साली महापालिकेत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर झाला होता. मात्र, राज्य शासनाने वारंवार माहिती मागवूनही २०१७ पासून हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. स्थानिक ग्रामपंचायतींच्या आर्थिक उलाढाली व सत्तास्थानावर परिणाम होईल, या भीतीने गावपातळीवरील काही नेत्यांचा याला विरोध होतो आहे.

प्रदूषणात वाढ, नागरी सुविधांवर ताण
आयटीतील डोलारा प्रचंड वाढल्याने नागरी सुविधांवर प्रचंड ताण आला आहे. लोकसंख्या अव्वाच्या सव्वा झाली. हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण वाढले. वाहतूक समस्या गंभीर बनली आहे. मल:निस्सारण, ड्रेनेज सुविधा कोलमडली आहे, कचरा समस्येचा उद्रेक झाला आहे. तर, पाणीपुरवठा व्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाला आहे.

मागील वर्षी दिले होते निवेदन
‘पीएमआरडीए’च्या कारभाराला वैतागून गेल्या वर्षी मारुंजीतील सुमारे दोनशे ग्रामस्थांनी गाव पिंपरी चिंचवड महापालिकेत घ्यावे म्हणून महापालिका आयुक्तांना सह्यांचे निवेदन दिले होते.

स्थानिकांच्या विरोधाची कारणे
- ग्रामपंचायतच्या तुलनेत करात वाढ होण्याची भीती
- बेसुमार अनधिकृत बांधकामावर हातोडा पडण्याची भीती
- मनमानी उभी राहिलेली अतिक्रमणे भुईसपाट होण्याची धास्ती
- बांधकामे पडल्यास ग्रामस्थांचे जागभाडे थांबणार
- नेत्यांच्या मनमानीवर महापालिकेचा अंकुश येण्याची भीती
- शेतजमिनींवर आरक्षण पडल्यास योग्य मोबदला न मिळण्याची भीती


राज्य आणि केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे हिंजवडी आयटी पार्क जागतिक स्तरावरील तोलामोलाचे करायचे असल्यास महापालिकेत समावेश करण्याशिवाय पर्याय नाही. पालकमंत्री अजित पवार यांनी हा ड्रीम प्रोजेक्ट साकारावा. यातून संपूर्ण जगासाठी हिंजवडी आयटी पार्क रोल मॉडले ठरावे. या निवडणुकीआधी समावेशाबाबत अधिसूचना काढावी.
- वसंत साखरे, हिंजवडी ग्रामस्थ तथा ज्येष्ठ मार्गदर्शक

आयटी क्षेत्रातील सर्वच परिस्थिती आवाक्याबाहेर गेली आहे. सर्व काही लयाला जाण्याआधी आणि आपल्या भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी किंवा आयटी पार्क स्थलांतरित होऊन वाईट दिवस येण्याआधी आयटीतील गावांचा महापालिकेत समावेश होणे अतिशय गरजेचे आहे. दीर्घकालीन विकासासाठी महापालिकेशिवाय गत्यंत्तर नाही.
- आनंद बुचडे, रहिवासी, मारुंजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com