महापालिका नको, स्वतंत्र नगर परिषद करा
बेलाजी पात्रे : सकाळ वृत्तसेवा
हिंजवडी, ता. ३० : आयटीनगरी माण, हिंजवडी गावे महापालिकेत जाणार असल्याच्या चर्चा आणि हालचाली सध्या सुरू आहेत. यापूर्वी विशेष ठराव मंजूर करून, तसेच राज्य सरकारला पत्रव्यवहार करून या ग्रामपंचायतींनी महापालिकेत जाण्यास विरोध केला आहे. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘‘यापूर्वी समाविष्ट गावांचा परिपूर्ण विकास करा, मगच आमची गावे महापालिकेत घ्या’’ अशी भूमिका या दोन्ही ग्रामपंचायतींसह काही ग्रामस्थांनी घेतली आहे. येत्या आठवड्यात याबाबत विशेष ग्रामसभादेखील बोलावण्यात आली आहे.
हिंजवडीतील पायाभूत सुविधांचा सुमार दर्जा, रखडलेली पर्यायी रस्त्यांची कामे, वाहतूक कोंडीचा तिढा या समस्या रोजच भेडसावत आहेत. त्यात पावसामुळे आयटी परिसराची झालेली फजिती पाहता आयटीयन्स आणि काही रहिवाशांनी महापालिकेत समावेशाची मागणी करत ‘अनलॉक हिंजवडी’ चळवळ उभी केली. त्या माध्यमातून या गावांचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, ‘‘हिंजवडी परिसरातील गावे महापालिकेत घेण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नगर परिषद अथवा नगरपालिका करा,’’ यासाठी ग्रामपंचायतींसह काही ग्रामस्थ आग्रही आहेत. मात्र, ही गावे महापालिकेत जाणार अथवा त्यांचा स्वतंत्र विचार होणार याबाबत या पावसाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, ‘‘महापालिका हद्दीत अनेक समस्या, पायाभूत सुविधा भेडसावत आहेत. केवळ कराची गोळाबेरीज करण्यासाठी आम्हाला ‘बळीचा बकरा’ करू नये,’’ असे काही ग्रामस्थांचे मत आहे. ‘‘आमच्या ग्रामपंचायतींना पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर प्रशासकीय यंत्रणांची साथ मिळाल्यास या गावांचा अपेक्षित विकास साधता येईल,’’ अशी मागणी ग्रामपंचायती करत आहेत.
नागरिक म्हणतात...
- आयटी नगरीची स्वतंत्र ओळख कायम ठेवण्यासाठी स्वतंत्र विचार व्हावा
- परिसरातील गावांचा महापालिकेत समावेश केल्यास आयटीची ओळख पुसली जाईल
- येथील पायाभूत आणि नागरी सुविधा देण्यास ग्रामपंचायती सक्षम आहेत. मात्र, काही शासकीय संस्थांकडून गांभीर्याने काम केले जात नाही. त्यामुळे समस्यांनी डोके वर काढले आहे.
वाढते नागरिकरण पाहता हिंजवडीसह पाच गावांची स्वतंत्र नगर पालिका करावी. महापालिकेत समावेश होण्यास आमचा तीव्र विरोध आहे. तसा पत्रव्यवहार शासन दरबारी केला आहे. शासनाने ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करावा. महापालिकेत समावेश करून आमची गळचेपी करून आमची आयटी म्हणून असलेली स्वतंत्र असलेली ओळख पुसू नये.
- गणेश जांभुळकर, सरपंच, हिंजवडी
आयटी पार्कचा साठ टक्क्यांहून अधिक भाग माण ग्रामपंचायत हद्दीत येतो. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामस्थांना आवश्यक सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत सक्षम आहे. लोकहिताचे अनेक प्रकल्प आम्ही साकारले आहेत. येथे कार्यरत असणाऱ्या इतर प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे आयटी परिसरात मूलभूत समस्या जाणवत आहे. यापूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचीही दयनीय अवस्था आहे.
- अर्चना सचिन आढाव, सरपंच, माण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.