आराखड्यात रस्ता दिसला अन् हृदयाचा ठोका चुकला
बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, तर. १६ : सोसायटीच्या आवारात डीपी रस्त्याचे आरक्षण पडले...अशी अफवा पसरली आणि ताथवडेतील एलेमेंटा फेज-१ या उच्चभ्रू सोसायटीमधील नऊशे कुटुंबीयांच्या हृदयाचा ठोका अक्षरश: चुकला. रहिवाशांमध्ये असंतोष अन् प्रशासनाबद्दल संताप पसरला. सोसायटीचे सदस्य विरोधाचे फलक घेऊन रस्त्यावर उतरले. पण, अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती विशद केली आणि सोसायटीमधील सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. मात्र, लेखी आश्वासन द्यावे, अशी त्यांची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही.
महापालिका प्रशासनाने शहराचा प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यासाठी १४ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवल्या होत्या. ताथवडेतील एलेमेंटा फेज-१ सोसायटीच्या काही सदस्यांनी आराखड्याची कॉपी डाऊनलोड केली आणि सोसायटी आवारातच १८ मीटर रस्त्याचे आरक्षण असल्याचा समज झाला. कारण, सूचीमध्ये राखाडी रंग हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी; तर पिवळा रंग हा रहिवासी क्षेत्र म्हणून दाखविण्यात आला आहे. सोसायटीतील रस्ता हा राखाडी रंगाचा असल्याने त्यावरून वादळ उठले. तीनशेहून अधिक हरकती नोंदविण्यात आल्या.
महापालिका नगररचना विभागाच्या उपसंचालिका अनुपमा कुलकर्णी यांच्यासोबत रहिवाशांनी बैठक घेतली. सोसायटीच्या सचिव स्नेहल फटिंग, अतुल होनमाने, निखिल रेगे, मज्जुएन्द्र तिवारी, देवेंद्र लांबोळे आणि सहकारी उपस्थित होते. तेव्हा खरी वस्तुस्थिती लक्षात येऊन सोसायटीच्या सदस्यांचा जीव भांड्यात पडला. प्रारूप नकाशाच्या सूचीतील राखाडी रंग हा अंतर्गत रहदारी रस्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत नगररचना विभागाच्या उपसंचालिका अनुपमा कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तो उचलला नाही.
आराखड्यात दर्शवलेला रस्ता हा केवळ सोसायटीचा अंतर्गत रस्ता आहे. तो विकास आराखड्यातील (डीपी)सार्वजनिक रस्ता नाही. नगररचना विभागाच्या उपसंचालिका अनुपमा कुलकर्णी यांच्यासोबतच्या अधिकृत बैठकीत ही माहिती मिळाली. प्रस्तावित डीपी रस्ते लाल सीमारेषांनी दर्शवले जातात आणि अशा कोणत्याही लाल सीमारेषा एलिमेंटा सोसायटीच्या हद्दीत नसल्याचे त्यांनी नमूद केले. तरीही सोसायटीने हरकती नोंदविल्या आहेत.
- स्नेहल फटिंग, सचिव, एलिमेंटा हाउसिंग सोसायटी, ताथवडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.