मला वाटलं आयुष्य संपले ! पण, मित्रांनी पुन्हा जगायला शिकवले...
मैत्री दिन विशेष
बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. ३ : थेरगावमधील गुजरनगर येथील सामान्य कुटुंबातील राहुल कणगरे ऐन उमेदीतला तरुण. गेल्या महिन्यात काही समाज कंटकांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला करत त्याच्या दोन्ही हातांचे पंजे छाटले. स्वप्नांनी भरलेला राहुल एका क्षणात निराशेच्या गर्तेत लोटला गेला. पण, ही कहाणी फक्त दुःखाची नाही; तर मित्रांच्या नि:स्वार्थ प्रेमाची, एकजुटीची आणि मानवतेची आहे. त्यांनी राहुलला पुन्हा आयुष्याकडे आशेने पाहण्याची ताकद दिली. त्याचे तोडलेले दोन हात जोडण्यासाठी शेकडो ‘हात’ त्याच्या मदतीसाठी सरसावले.
राहुल कणगरे (वय ३३) मेहनती आणि हसतमुख तरुण. तो आपल्या कुटुंबाचा आधार होता. त्याच्यावरील हल्ल्याने कुटुंबावर जणू आकाश कोसळले. राहुलची स्वप्ने, त्याची मेहनत आणि आत्मविश्वासच नष्ट झाला. डॉक्टरांनी सांगितले की, प्रगत शस्त्रक्रियेद्वारे त्याचे हात पुन्हा जोडले जाऊ शकतात. पण, त्यासाठी लागणारा खर्च लाखोंच्या घरात होता. हा खर्च राहुलच्या गरीब कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता. मात्र, मित्रांना ही बातमी समजली; तेव्हा त्यांनी हार मानली नाही. मित्र विकास असवले, योगेश रानवडे, नारायण वाघमोडे, रवी भिलारे, स्वप्नील कुंभार, आकाश हेगडे, हरी वाघमोडे आणि इतर काही जणांनी त्याला आधार देत एकजुटीची ताकद दाखवली. त्यात वंदे मातरम महिला मंडळानेही पुढाकार घेतला. काही आठवड्यांत मित्रांनी शस्त्रक्रियेसाठी लागणारी साडेपाच लाख इतकी मोठी रक्कम जमा केली. त्या आधारे राहुलवर पिंपरीतील एका नामांकित रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने त्याचे दोन्ही हातांचे पंजे पुन्हा जोडले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
राहुल आमचा मित्र आहे. आमचा भाऊ आहे. त्याने नेहमी आम्हाला हसवले. आम्हाला साथ दिली. आता आमची वेळ आहे. त्याला आधार देण्याची.
- विकास आसवले, राहुलचा मित्र
मला वाटलं माझं आयुष्य संपले. पण, माझ्या मित्रांनी मला पुन्हा जगायला शिकवले. माझ्या मित्रांनी केवळ पैशाची मदत केली नाही; तर मला आयुष्याकडे नव्याने पाहण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या एकजुटीने आणि निःस्वार्थ प्रेमाने मला पुन्हा स्वावलंबी बनण्याची संधी मिळाली. आज मी हळूहळू आपले हात पुन्हा वापरायला शिकत आहे. मित्रांचे आणि समाजाचे हे ऋण कधीच विसरणार नाही.
- राहुल कणगरे, पीडित तरुण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.