मोबदल्याच्या मागणीसाठी जागा मालकांचे आंदोलन

मोबदल्याच्या मागणीसाठी जागा मालकांचे आंदोलन

Published on

हिंजवडी, ता. ७ : हिंजवडी - माण रस्त्यावरील रुंदीकरणाच्या कार्यवाहीनंतर राडारोडा उचलण्यासाठी पोलिस बंदोबस्तात दाखल झालेल्या पीएमआरडीए पथकाला स्थानिक जागा मालकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. ‘आधी मोबदला द्या, जागा मोजून द्या, मगच ताबा घ्या’, अशी मागणी करत राडारोडा हटविण्यास विरोध दर्शवत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
उपजिल्हाधिकारी दीप्ती सूर्यवंशी, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, तहसीलदार आशा होळकर, रवींद्र रांजणे यांच्यासह पोकलँड, जेसीबी, डंपर इत्यादी यंत्र सामग्री, मजुरांसह ताफा हिंजवडी-माण रस्त्यावरील पांडवनगर येथे दाखल झाला होता. त्यावेळी ही मनमानी असल्याचा आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांसह काही स्थानिक ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून आमदार शंकर मांडेकर देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करत अधिकारी व ग्रामस्थांमध्ये समन्वय साधला. दरम्यान, पीएमआरडीए आयुक्तांच्या लेखी आदेशानुसार, जागा मालकांना टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलक शांत झाले.

‘आयटी’तील बहुतेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी पीएमआरडीए व एमआयडीसीकडून कार्यवाही सुरू आहे. या शासकीय कामकाजात कुठलाही अडथळा येऊ नये अथवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त पुरविण्यात आला होता. आडकाठी व उद्दामपणा करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतले आहे.
- बालाजी पांढरे, वरिष्ठ, पोलिस निरीक्षक


हिंजवडी - माण रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविल्यानंतर पडलेला राडारोडा उचलण्याच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. याखेरीज अन्य रस्त्यांचे सर्वेक्षण करून रस्त्यांतील अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजाविण्यात येत आहेत.
- आशा होळकर, तहसीलदार, पीएमआरडीए


उपमुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक
‘आयटी’तील काही प्रस्तावित रस्त्यांबाबत तसेच गावठाणामधून जाणाऱ्या रस्त्यांना विरोध करत ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार आज सकाळी अजित पवार पीएमआरडीए कार्यालयात ग्रामस्थांची संवाद साधणार आहेत.

WKD25A09232

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com