डांगे चौकाची कोंडी अन् समस्यांचा ‘बाजार’
बेलाजी पात्रे : सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. २५ : थेरगावातील डांगे चौक हा वाहतुकीचा प्रमुख परिसर आहे. तरीही हा चौक गेल्या वर्षभरापासून गोंधळ वाढवणारा ठरला आहे. येथे वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. रोजच्या गर्दीमुळे वाहनचालक आणि पादचारी त्रस्त झाले असून, रविवारी (ता. २४) रात्रीही येथे ‘चक्का जाम’ स्थिती होती. रस्त्यांलगत दुहेरी पार्किंग, सिग्नलची कमतरता, वाहतूक नियोजनाचा अभाव, आठवडे बाजार आणि बेकायदेशीर फूड स्टॉल्स यामुळे येथील समस्या अधिक गंभीर बनली आहे.
नागरिकांच्या तक्रारी वाढत असतानाही महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून अद्याप ठोस उपाययोजना दिसत नाहीत. डांगे चौक हा पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणारा महत्त्वाचा ‘जंक्शन’ आहे. मात्र, येथे वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे दररोज खोळंबून ठेवतात. रविवारी दिवसा अन् रात्रीही दहाच्या सुमारास झालेल्या कोंडीमुळे शेकडो वाहने रस्त्यावर थांबली होती. डांगे चौकात वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी केली जातात, ज्यामुळे मुख्य रस्ता अरुंद होतो. याशिवाय, यसिग्नल नसल्यामुळे वाहतुकीचे नियंत्रण होत नाही. त्यामुळे कोणीही, कसाही, कुठूनही व उलट-सुलट दिशेने जातो. येथे वाहतूक पोलिस किंवा वॉर्डन नसल्याने कोंडी सोडवण्यासाठी काहीही उपाययोजना होत नाहीत.
बीआरटी रस्त्यातच आठवडे बाजार
दर रविवारी येथे बीआरटी रस्त्यातच भला मोठा आठवडे बाजार भरतो. शेकडो भाजी, फळे व अन्य विक्रेते जीव धोक्यात घालून या रस्त्यात बस्तान मांडतात. रविवार हा आठवड्यातील सर्वाधिक गर्दीचा दिवस असतो. रस्त्यावर दुकाने आणि विक्रेते थांबतात. इतर व्यावसायिकही रस्त्यावरच आपली दुकाने थाटतात. त्यामुळे हा रस्ता पूर्ण ठप्प होतो.
बेकायदेशीर फूड गल्ल्या-चौपाट्या
बेकायदेशीर फूड गल्ल्या ही आणखी एक मोठी समस्या आहे. या फूड स्टॉल्सची संख्या वाढत असून, त्यांची पार्किंगही रस्त्यावरच केली जाते. ग्राहक रस्त्याच्या मध्येच वाहने उभी करून खरेदी करतात. ज्यामुळे इतर वाहनांना जागा राहत नाही. फूड स्टॉल्समुळे रस्ता पार्किंग लॉटसारखा दिसतो. कायद्याने कारवाई का होत नाही, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत.
डांगे चौकात कधी-कधी तासभर अडकावे लागते. यामुळे आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागतो. नागरिक या समस्येने वैतागले आहेत. डांगे चौकातून जाणे म्हणजे रोजचा त्रास. विशेषतः रविवारी तर असह्य होते. महापालिका आणि पोलिस काय करतात?
- आशिष कांबळे, रहिवासी, गणेशनगर
मुलांना शाळेत सोडण्यासाठीही वेळ लागतो. ही वाहतूक कोंडी आरोग्यावरही परिणाम करते, कारण प्रदूषण वाढते. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरही या समस्येबाबत तक्रारी केल्या आहेत, मात्र, प्रशासन काहीही करत नाही.
- मीना मोटे, राहिवासी, वनदेवनगर, थेरगाव
डांगे चौकात वाहतूक नियंत्रणासाठी आम्ही प्रयत्न करतो. दुहेरी पार्किंग करणाऱ्यांना दंड आकारतो. डांगे चौकातील आठवडे बाजार हटवण्याबाबत महापालिका प्रशासनाशी पाठपुरावा सुरू आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिस मिळून संयुक्त मोहीम राबविणार आहोत.
- मधुकर थोरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग
‘या’ उपाययोजना शक्य
- सिग्नल यंत्रणा उभारणे
- पार्किंगची व्यवस्था करणे
- बेकायदेशीर स्टॉल्स हटवणे
- वाहतूक नियोजनाची योजना राबवणे
- पोलिस आणि वॉर्डनची नियुक्ती करणे
- आठवडे बाजारासाठी अन्य जागा निवडणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.