बेदरकार वाहनांमुळे आणखी एक बळी

बेदरकार वाहनांमुळे आणखी एक बळी
Published on

हिंजवडी, ता. १० : आयटी नगरी माण-हिंजवडी परिसरात गर्दीच्या वेळेत बंदी असतानाही शिरकाव केलेल्या सिमेंट मिक्सरखाली सापडून दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.१०) सकाळी अकराच्या सुमारास घडली. यामुळे आयटी परिसरातील खराब रस्ते आणि प्रामुख्याने बेदरकार चालविल्या जाणाऱ्या मिक्सर-डंपरसारख्या वाहनांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भारती मिश्रा (वय ३०, रा. थेरगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या व्यवसायाने ब्युटीशियन होत्या. या प्रकरणी मिक्सरचालक मोहम्मद अल्ताफ अब्बास अली (वय २१, रा. वाघजाई मंदिरासमोर, चांदे) याच्यावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘हिंजवडी-माण परिसरात बंदीचे उल्लंघन करून एमएच १२-वायक्यू ०९७८ क्रमांकाचा सिमेंट मिक्सर माणच्या दिशेने जात होता. पांडवनगर येथील ‘स्ट्रीट ऑफ युरोप’ परिसरातून भारती मिश्रा या एमएच १४-ईएक्स १३४१ क्रमांकाच्या दुचाकीवरून माणकडे जात होत्या. त्यावेळी खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात मिक्सरची धडक दुचाकीला बसली आणि भारती या मिक्सरखाली सापडल्या. यात त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, जमावाकडून मारहाण होईल या भीतीने चालकाने मिक्सरसह पळ काढला होता. पोलिसांनी तपास करून त्याला ताब्यात घेतले.

‘सकाळ’कडून वारंवार प्रकाश
बेदरकार अवजड वाहनांना लगाम लावण्यासाठी ‘सकाळ’ने वृत्तांच्या माध्यमातून या विषयावर वारंवार प्रकाश टाकला आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रत्युषा बोराटे या अकरा वर्षीय चिमुकलीलाही अवजड वाहनाने चिरडले होते. त्यावेळी अपघातास जबाबदार असणाऱ्या चालक-मालक व संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकावरही हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच धर्तीवर या अपघातप्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

‘आयटी’ क्षेत्रातील रस्त्यांवर पावलोपावली धोका
आयटी परिसर आणि पंचक्रोशीत बेकायदा ‘आरएमसी प्लांट’ आणि त्या मालाची वाहतूक करणाऱ्या मिक्सर, डंपर यांसारख्या अवजड आणि बेदरकार वाहनांची संख्या वाढली आहे. या मुळे आयटी परिसरात पावलोपावली धोका निर्माण झाला आहे. या अवजड वाहनांचे, प्लांटचे बहुतेक मालक नेते, बिल्डर आणि काही स्थानिक नागरिक आहे. त्यातच मग्रूर वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे आयटीतील अपघातांची संख्या वाढत आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा
आयटी पंचक्रोशीतील सर्वच रस्त्यांची स्थिती विदारक आहे. सर्वत्र खड्डे, राडारोडा पसरला आहे. काही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली; मात्र राडारोडा पडून असल्याने दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते. खड्डे चुकवण्याचे दिव्य पार पाडावे लागते. यातूनच गंभीर अपघात होत आहेत. खराब रस्ते, बेदरकार वाहने आणि देखरेखीचा अभाव यामुळे अनेक जीव धोक्यात आहेत. यावर तोडगा काढण्यास प्रशासकीय अधिकारी आणि नेत्यांना अजूनही यश मिळालेले नाही. त्यामुळे मात्र निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com