कुर्यात सदा मंगलम्...शुभ मंगल सावधान !

कुर्यात सदा मंगलम्...शुभ मंगल सावधान !

Published on

हिंजवडी, ता. ३ : भल्या पहाटेचा प्रहर, सनई-चौघड्यांचा मंजुळ स्वर, हजारो ग्रामस्थ वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती, वधू-वरांच्या मामांच्या हस्ते सुपारी फुटली अन् वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने पारंपारिक पद्धतीने तुळसी विवाह झाला. फटाक्यांची आतषबाजी, शेकडो पै-पाहुण्यांच्या जेवणाच्या पंगती, अशा थाटामाटातील तुळशी विवाह सोहळा आयटीयन्सनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.
जगाच्या नकाशावर हिंजवडी गाव माहिती तंत्रज्ञान नगरी म्हणून झळकले आहे. मात्र या गावाने आजही आपल्या रूढी परंपरा, सण-वार आणि उत्सव कायम जपले आहेत. दरवर्षी साजरा होणारा सार्वजनिक तुळशी विवाह यंदाही प्रबोधिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी (ता.३) पहाटेच्या सुमारास हिंजवडी गावठाणातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात द्वादशीला तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील ५० वर्षांहून अधिक काळापासून हिंजवडी गावठाणातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्वादशीला सार्वजनिक तुळशी विवाह साजरा करण्यात येतो. त्यामध्ये सर्व ग्रामस्थ, माता-भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. तुळशी विवाह परंपरेला मोठे महत्व असल्याचे कीर्तनकार यशवंत साखरे, राम जांभूळकर यांनी सांगितले. या सोहळ्याचे समस्त हिंजवडी ग्रामस्थ आयोजन करतात.
यंदा सुद्धा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सर्व धार्मिक सोपस्कार झाल्यानंतर विवाह मंडपात नवरदेव चि. कृष्ण देवराय यांना पोशाख व फेटा घातला. वधू राणी चि.सौ.का. तुळशी माईला साडी-चोळी, हिरवा चुडा नेसविण्यात आला. दोघांच्या डोक्याला बाशिंग, मुंडावळे बांधून व हळद लावून सजविण्यात आले. काकड आरती, महापूजा झाली. अक्षदा वाटप होऊन पहाटेच्या गोरज शुभमुहूर्तावर मंगलाष्टक गात तुळशी विवाह पार पडला.

सांगवी परिसरातही उत्साह
जुनी सांगवी ः दापोडी, सांगवी, फुगेवाडी येथील विविध मंदिरांमध्ये तुळशी विवाह मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने झाला. मंगलाष्टकांबरोबरच ओम श्री तुळशी विवाहाय नमः, स्वस्ति श्री लक्ष्मीनारायणाय नमः यासारख्या मंत्रोच्चाराचा आणि भक्तिगीतांचा नाद घुमला. सचिन काटे, गणेश पाचंगे, राजेंद्र गरुड, अभिषेक पाचंगे, भरत पांडे यांनी मंदिरामध्ये सनई-चौघडा वादन केले. तुळशी विवाहासाठी मंगलाष्टांचे गायन रिधिमा काटे, राजश्री बाईत, शुभांगी काटे, पौर्णिमा यादव, सुरेखा काटे, हेमा नायडू आदींनी केले.

WKD25A09770

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com