टीकाटिपणी नव्हे, तर लक्ष मतदारांवर
वाकड, ता. ३ : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या पद्धतीने टीकाटिप्पणी केली, त्या वाटेने जाण्याचा आमचा विचार नाही. आम्ही कुणावरही टीका करणार नाही. आमचे लक्ष केवळ नागरिकांच्या प्रश्नांवर, मतदारांशी थेट संवादावर आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर केंद्रित आहे,’ अशा शब्दांत शिवसेना नेते, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. ३) दुपारी भूमिका स्पष्ट केली.
वाकडमधील एका खासगी हॉटेलमध्ये सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना उमेदवार मार्गदर्शन मेळावा तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सामंत म्हणाले, ‘शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत मुद्द्यांवर पक्ष ठोस अजेंडा घेऊन मतदारांसमोर जाणार आहे. येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत संघटनात्मक तयारी, मतदारांशी संपर्क, प्रभागनिहाय रणनीती आणि कार्यकर्त्यांचे कामकाज यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.’
या बैठकीला शिवसेना उपनेते तसेच खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना संपर्क मंत्री योगेश कदम, शहाराध्यक्ष नीलेश तरस, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, बाळासाहेब वाल्हेकर, युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, शहर संपर्कप्रमुख सुलभा उबाळे, इरफान सय्यद, माजी नगरसेवक मारुती भापकर, संपत पवार, नीलेश बारणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक प्रचारात शिस्त पाळण्याचे, आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आणि सकारात्मक प्रचारावर भर द्यावा, असे कानमंत्र सामंत यांनी दिले. बैठकीत प्रभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर सक्रिय राहणे, घराघरात संपर्क मोहीम, युवक व महिलांचा सहभाग वाढवणे आदी सूचनाही त्यांनी दिल्या.
---
पक्षाने केलेली कामे, हाताळलेले विषय कार्यकर्त्यांनी घरोघरी पोचवावेत. नकारात्मक राजकारणापेक्षा विकासाची स्पष्ट दिशा नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना हक्काचा आधार मिळवून दिला. त्यासह शहरातील शास्तीकर रद्द केले. प्राधिकरणबाधीत शेतकऱ्यांना साडे बारा टक्के परतावा मिळवून दिला, हे मुद्दे आपण अधोरेखित करायला हवेत.
- उदय सामंत, शिवसेना नेते, उद्योग मंत्री
---
वाकड : महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

