सौरऊर्जेतून हरित भविष्याकडे वाटचाल

सौरऊर्जेतून हरित भविष्याकडे वाटचाल

Published on

बेलाजी पात्रे
सकाळ वृत्तसेवा
हिंजवडी, ता. २३ : ऊर्जेच्या वाढत्या गरजा, वीज दरवाढ आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाची गरज अधिक तीव्र होत आहे. अशावेळी आयटी नगरी माणमधील मेगापोलिस सनवे सोसायटीने सौरऊर्जेचा स्वीकार करून हरित भविष्याकडे एक ठोस पाऊल टाकले आहे. सोसायटीने ४०० किलोवॅट क्षमतेचा रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केला आहे.
हिंजवडी परिसरातील हा एक सर्वात मोठा निवासी सोलर ऊर्जा प्रकल्प मानला जातो. २१ इमारतींच्या (टॉवर) छतांवर सुनियोजित पद्धतीने सोलर पॅनेल्स बसवण्यात आली आहेत. त्यामुळे छताचा कमाल उपयोग करून हिरवळीच्या जागा व सामाईक सुविधा कायम राहिल्या आहेत. या प्रकल्पाचा एरियल व्ह्यू आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन आणि अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरतो. प्रकल्पाचा लाभ ११७६ सदनिकांत राहणाऱ्या पाच हजारांहून जास्त रहिवाशांना झाला आहे.

वीजबचत, पर्यावरणरक्षण
या प्रकल्पामुळे सोसायटीच्या वीजबिलात दरमहा सुमारे पाच ते सहा लाख, तर वार्षिक ६० ते ७० लाख रुपयांपर्यंत बचत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांवरील आर्थिक भारही बराच कमी झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. यातून दरमहा ४० ते ४५ टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट होते. वार्षिक पातळीवर ही घट ४८० ते ५४० टनांपर्यंत जाते. घट दरवर्षी २० हजारांहून अधिक झाडे लावण्याइतकी किंवा एक हजारपेक्षा जास्त पेट्रोल वाहनांचा वापर थांबवण्याइतकी ही घट प्रभावी मानली जाते. हा प्रकल्प दरवर्षी ५.५ लाखांहून अधिक युनिट्स स्वच्छ वीज निर्मिती करतो. यातून लिफ्ट, पाण्याचे पंप, सामाईक जागेतील दिवे, क्लब हाऊस तसेच सुरक्षा यंत्रणेला वीज पुरवठा होतो. प्रकल्प उभारणीसाठी सोलार इजी बिडप्रोट्रेड सोल्यूशन्स कंपनीचे सहकार्य लाभले.


प्रेरणादायी उदाहरण

मेगापोलिस सनवे सोसायटीने या प्रकल्पाद्वारे आयटी पार्कमधील इतर मोठ्या निवासी संकुलांसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. समाजाधारित हरित उपक्रमांमधूनही मोठे पर्यावरणीय बदल शक्य आहेत, हे यातून सिद्ध होते. आहे. शाश्वत विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल केवळ आजसाठी नव्हे, तर उद्याच्या सुरक्षित आणि स्वच्छ भविष्यासाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
---
सौर ऊर्जा प्रकल्प केवळ वीजबचतीसाठी नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी केलेली जबाबदार गुंतवणूक आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श निर्माण करणे, हेच आमचे ध्येय आहे. यापुढेही पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यासाठी सोसायटी कटिबद्ध आहे.
- चेतन पगारे
चेअरमन, मेगापोलिस सनवे सोसायटी

---
व्यवस्थापन समिती, रहिवासी आणि तांत्रिक भागीदार यांच्यातील उत्तम समन्वयामुळेच हा प्रकल्प यशस्वी झाला आहे. संपूर्ण सनवे कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे.
- भूषण ढोरे, सचिव मेगापोलिस सनवे सोसायटी
---
हा सौर प्रकल्प आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा विषय आहे. वीजबिलात होणारी मोठी बचत तर आहेच, पण पर्यावरणासाठी सकारात्मक योगदान देत आहोत याचे समाधान अधिक आहे. सनवे सोसायटीने हरित आणि जबाबदार जीवनशैलीचा उत्तम आदर्श घालून दिला आहे.
- लक्ष्मी आनंद, रहिवासी, मेगापोलिस सनवे सोसायटी
---

माण : मेगापोलिस सनवे सोसायटीने उभारलेला भव्य सौर ऊर्जा प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com