विकेंडला ताथवडेकरांच्या काळजात होतेय धस्स...
वाकड, ता. १ : आयटी नगरीच्या उंबरठ्यावरील ताथवडे सध्या विकेंड आला की वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडत आहे. शनिवारी आणि रविवारी सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागतात. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना अक्षरशः रस्त्यावरच अडकून पडावे लागते. त्यामुळे विकेंड येताच काळजात धस्स होते. घराबाहेर पडावे की नाही ? असा प्रश्न ताथवडेकरांना मनात निर्माण झाला आहे.
ताथवडेतील भुयारी मार्गाची उंची अपुरी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणातील वाहने झटपट पास होत नाहीत, तर काहीवेळा बस, मालवाहू अवजड मोठी वाहने अडकतात. एक वाहन अडले की मागे किलोमीटरपर्यंत रांगा लागतात. परिणामी, चहूबाजूंचे रस्तेही ब्लॉक होतात. रावेत, किवळे, मामुर्डी, पुनावळे व शहरातील अन्य भागांत जाण्यासाठी आयटीयन्स देखील यात रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात. या सर्वांना कोंडीचा फटका सहन करावा लागतो. याबाबत प्रतिक्रिया जाण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
नियोजन कागदावरच
वाढत्या रहदारीमुळे ताथवडे भुयारी मार्ग चौक ‘बॉटलनेक’ ठरला आहे. आयटी कंपन्या, निवासी प्रकल्प आणि वाढती लोकसंख्या यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. मात्र, पायाभूत सुविधा त्यानुसार वाढल्या नाहीत. प्रशासनाचे नियोजन कागदावरच अडकले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
जाधव वस्तीचा प्रश्न अधांतरी
भुयारी मार्ग, अशोकनगर ते ताथवडे गावठाण चौकादरम्यान जाधव वस्ती सोडून बहुतेक रस्ता रुंदीकरण झाले आहे. जाधव वस्ती परिसरातील रस्ते रुंदीकरण प्रलंबित आहे. येथील बाधितांचे पुनर्वसन न झाल्याने काम रखडले आहे. परिणामी, संपूर्ण ताथवडेकरांना कोंडीचा फटका बसत आहे. बाधितांचे तत्काळ पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरण पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यास वाहतुकीची मोठी समस्या सुटू शकते.
समस्येवर एक नजर
- ताथवडे भुयारी मार्गाची उंची, रुंदी कमी
- मोठी वाहने सर्रासपणे अडकतात; परिणामी, दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प
- ताथवडे गावठाण मुख्य चौकात सिग्नल मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांचा अभाव
या भागात एलिव्हेटेड कॉरिडोर प्रकल्पाव्यतिरिक्त १२ मीटर रुंदी व ५ मीटर उंची असलेला भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. नवीन भुयारी मार्गामुळे कोंडीची समस्या कायमची सुटेल.
- विनोद पाटील, समन्वयक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
जाधव वस्तीत सुमारे ३५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील स्थानिक रहिवासी आहोत. आम्हाला या घरांव्यतिरिक्त दुसरी मालमत्ता नाही. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून ताथवडे भागातच आम्हाला म्हाडाची चांगली घरे अथवा जागा द्यावी, अशी आमची मागणी असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
- संजय जाधव, रस्ता बाधित रहिवासी
ताथवडे सेवा रस्त्यावरील सांडपाणी वाहिन्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे भुयारी मार्गात प्रचंड पाणी साठते तसेच सेवा रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत. सांडपाण्याची गळती थांबवून, सेवा रस्त्यांवरील खड्डे बुजवून तात्पुरते डांबरीकरण केले तरीही कोंडीतून मोठा दिलासा मिळू शकतो.
- बापू ढेरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग
WKD26A10584
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

