थेरगावच्या भावी वैज्ञानिकांची इस्त्रो भेटीसाठी निवड
वाकड, ता. ७ : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात थेरगावच्या संचेती प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत इस्रो भेटीची संधी मिळविली. या यशामुळे विद्यार्थ्यांसह शाळेचे कौतुक होत आहे. या भावी वैज्ञानिकांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
समर्थनाम ट्रस्ट फॉर डिसेबल आणि एफआयएस ग्लोबल यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. पुणे शहरातील ४१ हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला. विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि संशोधनवृत्ती दाखवून दिली. या स्पर्धेत संचेती प्राथमिक विद्यालयातील इयत्ता सातवीतील श्रावणी नितीन शिंदे, सार्थक गहिनीनाथ मोहरकर आणि यशराज बालाजी चव्हाण या विद्यार्थ्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हॉइस कंट्रोल रोबोट’ हा नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पाने परीक्षकांची विशेष दाद मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
या यशस्वी कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना इस्रो या प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थेला भेट देण्याची संधी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल आणि स्कूल बॅग असे पारितोषिक देण्यात आले. भविष्यातील वैज्ञानिक बनण्याच्या दिशेने ही भेट विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान शिक्षिका नेहा गुमते यांचाही सन्मान झाला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, सचिव वर्षा टाटिया, उपाध्यक्ष आदित्य टाटिया, रेनबो स्कॉलर्सच्या समन्वयक ऐश्वर्या बेदमुथा, मुख्याध्यापक व विभागप्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

