बैलगाडीच्या वाटेवरून मेट्रोची ‘धाव’

बैलगाडीच्या वाटेवरून मेट्रोची ‘धाव’
Published on: 

बेलाजी पात्रे : सकाळ वृत्तसेवा
हिंजवडी, ता. ३ : एकेकाळी बैलगाडी जाण्यासाठीही व्यवस्थित रस्ता नव्हता. पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागायची. शहराशी संपर्क साधण्यासाठी अडचणींचा यायच्या... अशा माण-हिंजवडी गावांच्या परिसरात मंगळवारी (ता. ३) मेट्रो धावण्याचा ऐतिहासिक क्षण साकारला. विकासाच्या या प्रवासात मेट्रोच्या रूपाने नवा अध्याय जोडला गेला.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयटी पार्कच्या उभारणीसाठी ज्यांनी जमिनी दिल्या, त्यांच्याच भूमीतून आता प्रवासाचे आधुनिक वाहन मेट्रो धावणार आहे. काळाच्या ओघात गावांचे रूप पालटले. शेतीच्या बांधावर आयटी कंपन्यांच्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. आता मेट्रोने धाव घेतली. हा प्रवास आणि मेट्रो उद्‍घाटनाचा सोहळा पाहताना जुन्या पिढीच्या डोळ्यांसमोर गावाचा जुना चेहरा उभा राहणे स्वाभाविक आहे. कारण, बैलगाडीच्या चाकांनी घडलेल्या चाकोरीने रुपांतर आता पक्क्या रस्त्यात आणि त्याच रस्त्यांवर उभारलेल्या खांबांवरून आज धावणारी मेट्रो म्हणजे काळाने घेतलेली मोठी झेप आहे. एका पिढीने गावाचा बदल अनुभवला, जमिनी दिल्या, संघर्ष केला, तर नव्या पिढीला आधुनिक वाहतुकीच्या सुविधेतून प्रगतीच्या नव्या संधीचा लाभ अन् सुख घेता येणार आहे.

शेवटच्या घटकापर्यंत हवा बदल...
मेट्रो म्हणजे माण-हिंजवडीच्या बदलत्या रुपाचे प्रतीक अनू आधुनिकतेचा अविष्कार आहे. मात्र, या मेट्रोच्या आगमनाबरोबरच जोडरस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांचाही विकास झाला, तरच या परिवर्तनाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व मिळेल. कधीकाळी बैलगाडी जाण्यासाठी रस्ता शोधणाऱ्या या गावातून आज मेट्रो धावणार आहे... काळ बदलला, गाव बदलले, विकासाची दिशा बदलली, आता या विकासाचा लाभ गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा, हीच माण-हिंजवडीच्या ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

आमच्या लहानपणी माण-हिंजवडी परिसरात बैलगाडी जाण्यासाठीही धड रस्ता नव्हता. चिखल, धूळ आणि खाचखळग्यांच्या रस्त्यांतून आम्ही प्रवास केला. आज याच मातीतून मेट्रो धावणार आहे, ही आमच्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल होताना पाहून मन भरून आले.
- नंदकुमार भोईर, ग्रामस्थ भोईरवाडी-माण

आम्ही लहानपणापासून हिंजवडी आयटी पार्कचा विस्तार पाहत आलो. मात्र, वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा त्रास कायम होता. आता मेट्रो सुरू झाल्याने शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील. आमच्या गावातून जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था सुरू होत आहे, याचा अभिमान वाटतो.
- संदीप साखरे, युवक, हिंजवडी

पूर्वी पुण्याला जायचे म्हटले, की प्रवासाचे नियोजन करावे लागायचे. तासन्‌तास कोंडीत अडकावे लागायचे. आता मेट्रोमुळे महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. आजचा दिवस आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा आणि अभिमानाचा आहे.
- सीमा पारखी, ग्रामस्थ, माण

गावाच्या विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या आमच्या पिढीने अनेक बदल अनुभवले. शेतीच्या बांधावरून सुरू झालेला प्रवास आज आयटी पार्क आणि मेट्रोपर्यंत पोहोचला आहे. मेट्रोच्या रूपाने ग्रामीण भागाच्या विकासाला नवी गती मिळाली असून, हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील.
- मच्छिंद्र पारखी, ग्रामस्थ, माण

मेट्रोमुळे आमच्या परिसर आणि गावाला वेग, आधुनिकतेचे महत्त्वपूर्ण इंजिन मिळाले आहे. आता वेळ, पैशांसह सुरक्षित, आरामदायी प्रवास होणार आहे. केवळ मेट्रोसाठीच्या अत्यावश्यक कनेक्टिव्हिटी अर्थात पार्किंग व्यवस्था आणि फीडर सेवेचा पर्याय मिळावा.
- हेमंत पंडित, आयटीयन्स, ब्ल्यूरिज सोसायटी, हिंजवडी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.