आठ महिन्यांच्या घुसमटीनंतर पर्यटकप्रेमींना सहलीचे लागले वेध; कोणत्या ठिकाणांना पसंती पहा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 February 2021

आठ महिन्यांच्या घुसमटीनंतर पर्यटकप्रेमींना सहलीचे वेध लागले आहेत. काश्‍मीर, सिक्कीम, दार्जिलिंग, हिमाचल प्रदेश, शिमला, कुलू-मनाली, उटी-म्हैसूर, नैनिताल या स्थळांना भटकंतीसाठी पसंती दिली आहे.

लॉकडाउननंतर लागले भटकंतीचे वेध; हनीमून पॅकेजचेही बुकिंग
पिंपरी - आठ महिन्यांच्या घुसमटीनंतर पर्यटकप्रेमींना सहलीचे वेध लागले आहेत. काश्‍मीर, सिक्कीम, दार्जिलिंग, हिमाचल प्रदेश, शिमला, कुलू-मनाली, उटी-म्हैसूर, नैनिताल या स्थळांना भटकंतीसाठी पसंती दिली आहे. ‘आम्हाला कोरोनासारख्या भीतीमधून दूर होऊन रिलॅक्‍सेशन हवंय’ असे म्हणत सध्याच्या सहलीचे बुकिंग सुरू आहे. त्याचबरोबर कोरोनात विवाह पार पडले. मात्र, हनीमून राहून गेले, अशी जोडपी सध्या हनीमून पॅकेजचा आनंद घेत असल्याचे टुरिझम कंपन्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउन खऱ्या अर्थाने सर्वांनाच असह्य झाले. यातून कुठेतरी मोकळीक मिळण्याची गरज महिला, चिमुकल्यांसह ज्येष्ठांना होती. सध्या याची प्रचिती शहरात येत आहे. ग्रुप बुकींगसह स्वतंत्रपणे सहलीचे नियोजन करून सर्वांनी आवडीच्या स्थळांकडे सहलीसाठी वाट धरली आहे. सर्वाधिक बुकिंग हे बर्फाच्छादित व थंड हवेच्या ठिकाणी होत आहे. सध्या वातावरणही सहलीचे असल्याने सर्वांनी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंतच्या सहलीच्या नियोजनाचा धडाका लावला आहे. रेल्वे, बस, मिनी बस, हेलिकॉप्टर सर्वांच्या खिशाला परवडेल अशा प्रकारे संधी पर्यटनामध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रकारे काही पर्यटन संस्थांनी डिस्काउंटही दिले आहे. महाराष्ट्राबाहेर हॉटेलच्या दरामध्ये दहा टक्के इतकी वाढ झाली आहे. सध्या पंचवीस ते तीसच्या गटाने सहलीचे ग्रुप बुकिंग होत आहे. मागणीप्रमाणे सोशल डिस्टन्स ठेवून बैठक व्यवस्थेचे नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर वाहने सॅनिटाइज करून हॉटेल देखील पूर्ण निर्जंतुकीकरण केले जात आहे. 

भोसरीतील कोविड सेंटरच्या बिलाबाबत पालिका अतिरिक्त आयुक्तांचा मोठा खुलासा

या स्थळांना देखील पसंती
केरळ, हिमालयीन चारधाम यात्रेत हरिद्वार, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, टेहरी गढवाल, केदारनाथ, बद्रिनाथ, मानागाव, ऋषिकेश असे पंधरा दिवसांचे बुकिंग देखील आहे. यात बस व हेलिकॉप्टरप्रमाणे शुल्क आहे. काश्‍मीर, वैष्णोदेवी, अमृतसर, साडेतीन शक्तीपीठे, अष्टविनायक, तिरुपती या धार्मिक स्थळांचाही समावेश आहे.

सध्या साठ टक्के बुकींगला प्रतिसाद आहे. पर्यटन क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. पर्यटकांची दक्षता घेतली जात आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातून सध्या बुकिंग सुरू आहे. नवविवाहित जोडप्यांचाही समावेश आहे.
- यज्ञेश महाजन, टुरिझम कंपनी, निगडी

सध्या पर्यटनात सर्व हौशी नागरिकांसह कोरोनामुळे घराबाहेर न पडलेल्या नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. यात सर्व वयोगट आहे. पहिल्यांदाच नागरिकांच्या तोंडून आम्हाला मनसोक्त आनंद लुटायचा आहे. असे कानी पडत आहे. 
- निशिता घाटगे, सन टुरिझम, आकुर्डी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourist trip cold place corona